ढाका (बांगलादेश) येथे जिहाद्यांचे पुस्तक विक्री केंद्रावर आक्रमण !

तस्लिमा नसरीन यांचे पुस्तक विक्रीसाठी ठेवल्याने केले आक्रमण

ढाका – बांगलादेशाची राजधानी ढाका येथे एका पुस्तक मेळ्यातील सब्यसाची प्रकाशनाची पुस्तके विकणार्‍या केंद्रावर जिहाद्यांनी आक्रमण केले. या पुस्तक विक्रेत्याने बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे एक पुस्तक विक्रीसाठी ठेवले होते. यावर चिडलेल्या जिहाद्यांनी सब्यसाची प्रकाशनाच्या दुकानाला घेराव घातला आणि नंतर त्यावर आक्रमण केले.

या आक्रमणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना तस्लिमा नसरीन म्हणाल्या, ‘‘माझे पुस्तक विक्रसाठी ठेवणे, हा पुस्तक विक्री केंद्राच्या मालकाचा ‘गुन्हा’ होता. पुस्तक मेळ्याचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांनी माझे पुस्तक हटवण्याचा आदेश दिला. पुस्तक काढून टाकल्यानंतरही जिहाद्यांनी त्या केंद्रावर आक्रमण केले, त्याची तोडफोड केली आणि ते बंद पाडले. सरकार या जिहाद्यांना पाठिंबा देत आहे आणि जिहादी कारवाया देशभरात पसरत आहेत.’’ बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी या घटनेवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे आणि घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. सध्या पुस्तक मेळ्यात लावण्यात आलेला  ‘सब्यसाची पब्लिकेशन्सचा स्टॉल’ बंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात जिहादी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे, हेच या घटनेतून दिसून येते !