(कोमुनिदाद ही गावकर्यांची पोर्तुगीजकालीन संस्था)
मडगाव, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – मडगाव ते कोलवा मार्गावरील मुंगुल-मडगाव येथील कोमुनिदादच्या मालकीच्या भूमीवरील ३१ अनधिकृत बांधकामे १२ फेब्रुवारी या दिवशी पोलीस बंदोबस्तात भूईसपाट करण्यात आली. या वेळी मामलेदार आणि कोमुनिदाद प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
याविषयी अधिक माहिती देतांना मडगाव कोमुनिदादचे अॅटर्नी (मुखत्यार) सेलीस्टीन नोरोन्हो म्हणाले, ‘‘संबंधित भूमी ही कोमुनिदादच्या मालकीची आहे आणि ती शेतभूमी आहे. ही भूमी सखल भागात असल्याने त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून काहींनी बांधकामे केली होती. याची नोंद घेऊन १२ वर्षांपूर्वी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये यावर निवाडा दिला होता. कोमुनिदाद प्रशासनाने ११ फेब्रुवारी या दिवशी या भागातील वीज आणि पाणी यांची जोडणी तोडली होती.’’
मोतीडोंगर येथील कोमुनिदाद भूमीतील अतिक्रमणे हटवणार
कोमुनिदादचे अॅटर्नी सेलीस्टीन नोरोन्हो पुढे म्हणाले, ‘‘लवकरच मडगाव येथील मोतीडोंगर, ताळसांझर आणि रवींद्र भवन यांच्या बाजूला असलेली कोमुनिदादच्या भूमीतील अतिक्रमणे भूईसपाट करण्यात येणार आहेत. तसेच मोतीडोंगर येथील आरोग्य केंद्र आणि पोलीस चौकी यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.’’