म्हापसा, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका बंदीवानाने झोपलेल्या दुसर्या बंदीवानावर पेनचा वापर करून आक्रमण करण्याची घटना १० फेब्रुवारी या दिवशी घडली. यामध्ये बंदीवानाच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून त्याच्या तोंडावरही पेनने आक्रमण करण्यात आल्याने त्याच्या तोंडावरही जखमा झालेल्या आहेत.
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानामध्ये मारामारीच्या घटना वारंवार घडत असतात; मात्र पेनचा वापर करून आक्रमण करण्याची घटना कारागृहात कदाचित् पहिल्यांदाच घडली असावी. घायाळ झालेला बंदीवान अझिझ असिफ याला तातडीने उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. आक्रमण करणार्या बंदीवानाला काही दिवसांपूर्वीच कारागृहात आणण्यात आले होते. संबंधित बंदीवानाने अझिझ असिफ याला ठेवण्यात आलेल्या कोठडीऐवजी दुसरीकडे ठेवण्याची मागणी केली होती; मात्र प्रशासनाने ती मान्य केली नव्हती. प्राप्त माहितीनुसार घायाळ झालेला बंदीवान अझिझ असिफ याने यापूर्वी एका बंदीवानाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा सूड म्हणून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.