श्री क्षेत्र आळंदीमध्ये तृतीयपंथियांचा भाविक आणि वारकरी यांना त्रास !

आळंदी (पुणे) – शहरातील माऊली मंदिर परिसर, शनि मंदिर परिसर, भराव रस्ता, इंद्रायणी घाट परिसर, शिवतेज चौक रस्ता इत्यादी ठिकाणच्या परिसरामध्ये तृतीयपंथी रस्त्याच्या मधोमध उभे राहून भाविक आणि स्थानिक यांना अडवून बळजोरीने पैसे घेत आहेत. या त्रासाला कंटाळून मंदिर परिसरातील स्थानिक व्यापार्‍यांनी पोलीस चौकीमध्ये या संदर्भातील निवेदन दिले आहे. (यासाठी निवेदन का द्यावे लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ? – संपादक) रस्त्याच्या मधोमध उभे राहून माऊली मंदिराकडे येणार्‍या भाविकांकडून पैसे वसूल केले जातात. नुकतेच लग्न झालेले वधू-वर देवदर्शनास आल्यानंतर त्यांना अडवून अधिक पैशांची मागणी केली जाते. पैसे दिले नाहीत, तर शिव्या, शाप (वाईट बोलणे) दिला जातो.

‘वारकरी दर्शनासाठी आले, तरी त्यांना वाट मोकळी करून दिली जात नाही. हे तृतीयपंथी बर्‍याच वेळा मद्य प्राशन करून रस्त्यामध्ये नाचणे, लोकांशी अंगलट करणे आदी गैरकृत्ये करत असल्याचे दिसून येतात. स्थानिक व्यापार्‍यांनी दुकानासमोर उभे रहाण्यास अटकाव केला, तर इतर साथीदारांकडून धमकीवजा भ्रमणभाष करून अश्लील भाषेत संभाषण करून त्रास देतात’, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.