अक्कलकुवा (नंदुरबार) येथील मदरशात २ विदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य !

पारपत्राची मुदत संपून ९ वर्षे उलटली !

प्रतीकात्मक छायाचित्र

नंदुरबार – जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था’ या मदरशात २ येमेन नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याचे जिल्हा विशेष शाखेच्या निदर्शनास आले होते. खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी आणि त्याची पत्नी खादेगा इब्राहीम कासीम अल-नाशेरी अशी त्यांची नावे आहेत. येथील ‘फूड इंडस्ट्रीज’ या आस्थापनाशी व्यापार करण्यासाठी व्यापारी व्हिसा घेऊन ते भारतात आले होते. मुलाच्या औषधोपचारासाठीही वैद्यकीय व्हिसा घेतला होता. त्याच्या पारपत्राची मुदत ६ डिसेंबर २०१५, तर त्याच्या कुटुंबाच्या पारपत्राची मुदत १९ डिसेंबर २०१६ पर्यंतच वैध होती; पण तरीही ते अद्याप येथे अवैधपणे रहात होते.

खालेद ४ जानेवारी २०१६ या दिवशी एका कार्यक्रमात सहभागी झाल्यावर परकीय नागरिक कायद्यानुसार अटक करण्यात आली; पण नंतर त्याची जामिनावर मुक्तताही झाली. मुदत संपून अनेक वर्षे होऊनही ते येथेचे वास्तव्यास आहेत. त्यांना आसरा देणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व मदरशांची चौकशी करावी !

मत्स्य व्यवसाय आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांची मागणी

या प्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘‘मदरशांतून शिक्षण दिले जाते, असे म्हटले जाते; पण जर अशा प्रकारच्या घटना उघड होत असतील, तर शिक्षणाच्या नावाखाली मदरसे हवेत कशाला ? अतिरेक्यांचे अड्डे म्हणून चालवले जाणारे मदरसे बंद करावेत. राज्यातील सर्व मदरशांची चौकशी करून तेथे शोधमोहीम राबवायला हवी. मदरशांच्या आत काय चालू आहे ? तेही पहायला हवे. अतिरेक्यांना पोसणारे मदरसे हवेत कशाला ?’’

संपादकीय भूमिका

  • मदरशांमध्ये विदेशी आणि आतंकवादी पार्श्वभूमी असलेले आश्रय घेतात, त्यांवर कारवाई केव्हा होणार ?
  • ९ वर्षे होऊनही विदेशी नागरिक अवैधपणे भारतात रहात आहेत, हे स्थानिक प्रशासन किंवा पोलीस कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ? त्यांचे तातडीने अन्वेषण आणि कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे, तसेच त्यांना पाठीशी घालणार्‍यांवरही कारवाई करायला हवी !