राज्यात १२ वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ४२ गैरप्रकार !

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २६ प्रकरणे

पुणे – महाराष्ट्र राज्य मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या १२ वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. १२ वीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला ४२ गैरप्रकारांच्या प्रकरणांची नोंद झाली आहेत. (परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार हे शिक्षण क्षेत्रासाठी लज्जास्पदच ! – संपादक) छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे २६ प्रकरणे नोंदवली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथकांसह बैठी पथके सिद्ध केली आहेत. ८१८ परीक्षा केंद्रांवरील कर्मचार्‍यांची अदलाबदली केली. संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवणे, गैरप्रकारांना साहाय्य करणारे आणि गैरप्रकार करणारे यांच्यावर अदखलपात्र अन् अजामीनपात्र गुन्हा नोंद करणे यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी पुणे विभाग ८, छत्रपती संभाजीनगर विभाग २६, नागपूर आणि अमरावती विभाग प्रत्येकी २, नाशिक विभाग ३ आणि लातूर विभागात १ अशी प्रकरणे झाली.

परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थ्याची दुसर्‍या मजल्यावरून उडी !

पुण्यातील नर्‍हे भागातील परीक्षा केंद्रामध्ये इंग्रजीचा पेपर चालू होता. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसर्‍या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. घायाळ झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.

हॉल तिकीट (कक्ष प्रवेशपत्र) मिळालेच नाही !

थेरगाव येथील ए.एस्.एस्.पी.एम्. महाविद्यालयातील १२ वीच्या ५ विद्यार्थ्यांना ‘हॉल तिकीट’ मिळाले नसल्याने त्यांच्या चालू वर्षाची शैक्षणिक हानी झाली आहे. महाविद्यालयाकडून ‘तुमचे कागदपत्र अपूर्ण असल्याने ‘हॉल तिकीट’ आले नाही’, असे सांगितले गेले. ‘महाविद्यालयाने मुलांच्या परीक्षेच्या संदर्भातील कागदपत्रे (फॉर्म) भरली नाहीत’, असा आरोप पालकांनी केला आहे.