‘एकात्म मानवतावाद’ : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टीकोन !

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ५७ वी पुण्यतिथी ११ फेब्रुवारी या दिवशी झाली. त्या निमित्ताने…

आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला, तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्गकेंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टीकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पहाणार्‍या पाश्चिमात्यांना आज उत्तरे सापडत नाहीत. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहे किंवा अंतर्गत अन् बाह्य संघर्षात गुरफटले आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी देशसुद्धा अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधार्‍यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत एका दूरदर्शी विचारवंताने ‘एकात्म मानवतावाद’ या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय ! जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (‘आर्.एस्.एस्.’चे) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते; परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट केले की, हा विचार त्यांनी निर्माण केलेला नसून तो भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेची शिकवण आहे. सनातन संस्कृतीमध्ये रुजलेले हे तत्त्वज्ञान आजही तितकेच सुसंगत आहे.

श्री. मंगल प्रभात लोढा

१. सर्वसमावेशक मानवी विकासाची दृष्टी

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी त्यांच्या लहानशा; पण प्रभावी आयुष्यात जगाला एक मार्गदर्शक तत्त्व दिले, ते म्हणजे ‘माणसाला तुकड्यांत विभागून नव्हे, तर संपूर्णतेने पाहिले पाहिजे, म्हणजेच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा समतोल साधत मानवाचा विचार केला पाहिजे, तसेच संपूर्ण विश्व एकमेकांशी जोडलेले आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांची परस्परपूरक समज विकसित करून त्यानुसार मानवी कृती घडल्या पाहिजेत. निसर्गाचा सन्मान आणि त्याचे संवर्धन हे आपल्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असले पाहिजे.’

संयुक्त राष्ट्रांनी (‘युनो’ने) पंडित दीनदयाळ उपाध्याय किंवा त्यांच्या तत्त्वज्ञानाला औपचारिक मान्यता दिलेली नसली, तरी २५ सप्टेंबर २०१५ या दिवशी स्वीकारलेल्या १७ ‘सस्टेनेबल डेव्हल्पमेंट गोल्स (SDGs – शाश्वत विकास उद्दिष्टे)’ हे एकात्म मानवतावादाचे प्रतिबिंब आहेत. योगायोग म्हणजे याच दिवशी त्यांचे जन्मशताब्दी वर्षसुद्धा चालू झाले होते.

२. भारताचा आत्मा गावांमध्ये आहे !

एकात्म मानवतावाद हा मानवकेंद्री विचार असून पंडित दीनदयाळ उपाध्याय मानत, ‘जसा व्यक्तीला आत्मा असतो, तसाच राष्ट्रालाही चिती, म्हणजेच राष्ट्रीय चेतना असते.’ त्यांच्या मते भारताचा आत्मा त्याच्या गावांमध्ये आहे आणि खर्‍या अर्थाने हा ग्रामीण समाजच राष्ट्र अन् आत्मा यांचे रक्षणकर्ता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचा विकास हा केवळ ग्रामविकासाद्वारेच साध्य होऊ शकतो.

ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय नानाजी देशमुख यांनी ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट (डी.आर्.आय.)’ची स्थापना केली. सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी कार्य करणार्‍या या संस्थेने गोंडा, बीड आणि चित्रकूट येथे विकास प्रकल्प राबवत स्थानिक ज्ञान अन् आधुनिक उपाय यांचा संगम घडवला. या कार्याच्या गौरवार्थ नानाजी देशमुख यांना वर्ष २०१९ मध्ये ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.

३. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे ५१ व्या वर्षी गूढ परिस्थितीत अकाली निधन

विचारवंत, नेते आणि मार्गदर्शक पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे सिद्धांतकार आणि संघटनात्मक मार्गदर्शक होते. वर्ष १९५२ जनसंघाच्या स्थापनेपासून ते १५ वर्षे सरचिटणीस राहिले आणि डिसेंबर १९६७ यावर्षी त्यांनी अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाने भारतीय राजकारणात मजबूत पाया रचला; मात्र केवळ ५१ व्या वर्षी त्यांचे गूढ परिस्थितीत अकाली निधन झाले.

त्यांचा अभ्यास केवळ भारतापुरता सीमित नव्हता, ते जागतिक आर्थिक-सामाजिक घडामोडींवरही लक्ष्य ठेवून होते. त्यांच्या भाषणांमधून त्यांनी भारतीय जनतेला आत्मसन्मान जपण्यास प्रेरित केले. त्यांनी मार्गदर्शन केले, ‘परिश्रम, धर्म (कर्तव्य), अर्थ (समृद्धी), काम (इच्छापूर्ती) आणि मोक्ष (अंतिम मुक्ती) या ५ पुरुषार्थांचा योग्य समतोल राखून जीवन जगावे.’ त्यांनी भारतीय संस्कृतीला धरून प्रगतीचा मार्ग आत्मसात करण्यास सांगितले. भारतीय समाजाला नेहमीच देशानुकूल आणि युगानुकूल विचारसरणी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

४. भारतासाठी पुढील मार्ग

आज भारत जगातील ‘सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश’ म्हणून स्वतःची हरवलेली सभ्यतावादी वैशिष्ट्ये पुन्हा प्रस्थापित करू पहात आहे. ऐतिहासिक भान, संस्कृती आणि परंपरा यांना आत्मसात करून भारत विकासाची नवी परिभाषा जगासमोर मांडण्याचे उद्दिष्ट बाळगतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी विचारले होते की, ‘आंतरराष्ट्रीय संस्था आणि परदेशी संस्था यांनी भारताचा विकासदर, साक्षरता किंवा आरोग्य परिस्थिती का ठरवावी ? जर भारताने स्वतःचे मापदंड ठरवले नाहीत, तर बाहेरून आलेल्या शक्ती आपली मते लादत रहातील’, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच ओळखले होते.

आजचा भारत ‘एकात्म मानवतावाद’ या तत्त्वज्ञानाला आत्मसात करून ‘अंत्योदय’, म्हणजेच समाजातील शेवटच्या माणसाच्या उत्थानावर भर देणारी धोरणे राबवत आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या योजनांमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. गरिबांसाठी कल्याणकारी योजना असोत, संरक्षणातील आत्मनिर्भरता असो किंवा अंतराळ संशोधनातील यश असो, भारताची वाढती शक्ती त्यांच्याच विचारसरणीची प्रचीती आहे. त्यांच्या विचारसरणीने भारताला एका कमकुवत आणि संभ्रमित राष्ट्रातून एक आत्मसन्मान अन् आत्मनिर्भरतेचा आदर्श घडवला आहे. आजचा भारत एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने दिमाखात वाटचाल करत आहे.

– श्री. मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार (१०.२.२०२५)