PM Modi’s Unforgettable Marseille Visit : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांना सोपवण्यास विरोध करणार्‍या मार्सेलिसच्या नागरिकांचे आभार !

पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौर्‍याच्या वेळी मार्सेलिस शहराला भेट  

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

पॅरिस (फ्रान्स) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या फ्रान्सच्या भेटीवर असतांना १२ फेब्रुवारी या दिवशी मार्सेलिस शहराला भेट दिली. येथे त्यांनी भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचेही उद्घाटन केले. या वेळी त्यांच्या समवेत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित होते. याच शहराच्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० या दिवशी इंग्रजांच्या नौकेतून उडी मारून या शहराच्या किनार्‍यावर पोचले होते. या संदर्भाची आठवण करत पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘मार्सेलिसला पोचलो. भारताच्या स्वातंत्र्याच्या शोधात या शहराचे विशेष महत्त्व आहे. इथेच महान वीर सावरकर यांनी धैर्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांना ब्रिटिशांच्या कह्यात देऊ नये, अशी मागणी करणार्‍या मार्सेलिसच्या लोकांचे आणि त्या वेळच्या फ्रेंच कार्यकर्त्यांचेही मी आभार मानू इच्छितो. वीर सावरकर यांचे शौर्य पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देत राहील. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांनाही मी श्रद्धांजली वाहीन.’

फ्रान्सने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात कसे केले होते साहाय्य ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजी पोलीस घेऊन गेल्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्स यांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला होता. फ्रान्सने आरोप केला होता की, ‘सावरकरांना परत नेणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. ब्रिटनने याचे योग्य पालन केले नाही.’ वर्ष १९११ मध्ये कायमस्वरूपी लवाद न्यायालयाने सावरकरांच्या अटकेत अनियमितता असल्याचा निकाल दिला. फ्रान्समधील लोकांनी आणि अनेक नेत्यांनी सावरकरांना ब्रिटनच्या स्वाधीन करण्यास विरोध केला होता. तथापि सावरकरांना फ्रान्सला परत सोपवण्यास ब्रिटन बांधील नव्हते.

हे वाचा → संपूर्ण युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप !

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करून फ्रान्सच्या नागरिकांचे आभार मानणारे पंतप्रधान मोदी यांचे आभार ! स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांत एकाही पंतप्रधानांनी असे कधी केले नाही, हे लक्षात घ्या !