Bangladesh To Involve China In Teesta Project : बांगलादेश भारताला मोठा धोका पोचवण्याच्या सिद्धतेत !

  • तिस्ता नदी प्रकल्पात चीनला सामावून घेण्याचा प्रयत्न

  • या प्रकल्पामुळे चीन भारताच्या ‘चिकन नेक’पासून अवघ्या १०० कि.मी. अंतरावर पोचेल !

तिस्ता नदी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अंतरिम सरकार तिस्ता नदीच्या संवर्धन आणि व्यवस्थापन यांच्या प्रस्तावित बहुउद्देशीय प्रकल्पात चीनला सहभागी करून घेऊ शकतो. यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही नदी सिक्कीममधून उगम पावते आणि उत्तर बंगालच्या काही भागांमधून सुमारे ३०५ कि.मी. अंतर पार करून बांगलादेशात प्रवेश करते. तिस्ता प्रकल्पावरून भारत आणि बांगलादेश यांमध्ये दीर्घकाळापासून वाद आहे; परंतु शेख हसीना यांच्या सरकारने चीनला या प्रकल्पापासून दूर ठेवले होते.

भारताला कसा आहे धोका ?

भारताच्या एका निवृत्त सैन्याधिकार्‍याने सांगितले की, तिस्ताशी संबंधित प्रकल्पात चीनला सहभागी करून घेण्याचा निर्णय, हा एक मोठा सुरक्षेचा प्रश्‍न असेल. ही नदी भारतातून बांगलादेशात प्रवेश करते ते ठिकाण (कूचबिहारमधील मेखलीगंजजवळ)  ‘सिलिगुडी कॉरिडॉर’पासून (सिलिगुडी मार्ग) केवळ १०० कि.मी. अंतरावर आहे. असे दिसते की, बांगलादेश भारतासाठी आणखी समस्या निर्माण करू इच्छित आहे.

काय आहे ‘चिकन नेक’ ?

‘सिलिगुडी कॉरिडॉर’ला भारताचे ‘चिकन नेक’ म्हटले जाते. हा भारतीय उपखंडातील सर्वांत पातळ भाग आहे, जो नेपाळ आणि बांगलादेश यांच्यामध्ये स्थित आहे अन् संपूर्ण ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील अस्थिरतेचा परिणाम केवळ तेथील हिंदूंवरच होत नसून तो भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करत आहे. असे असतांना भारताची निष्क्रीयता अनाकलनीय !