मिरज येथे जोशी-देशपांडे-कुलकर्णी यांसह सर्व ब्राह्मण समाजाचा मेळावा पार पडला !

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या पादुकांचे पूजन करतांना आधुनिक वैद्य मिलिंद कुलकर्णी

मिरज, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – उद्योग, व्यवसाय, विवाह आणि मैत्री हे चार उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मिरज येथील श्री आळतेकर सभागृह येथे जोशी-देशपांडे-कुलकर्णी यांसह सर्व ब्राह्मण समाजाचा मेळावा ९ फेब्रुवारीला पार पडला. या मेळाव्याचे आयोजन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. सदानंद गाडगीळ आणि त्यांच्या मित्र परिवाराने केले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ मिरज येथील आधुनिक वैद्य मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या पादुका पूजनाने झाली. या मेळाव्याला ‘जिल्हा उद्योग केंद्र, सांगली’च्या व्यवस्थापिका सौ. विद्या कुलकर्णी, ‘अमृत योजने’चे सल्लागार श्री. विश्वजीत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ हे होते.

या प्रसंगी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाज १६ संस्कार विसरत चालल्याने ब्राह्मणांची आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची अधोगती होत आहे. यासाठी सर्वांनी धर्माचरण केल्यास हिंदु धर्म गतवैभव प्राप्त करील.’’ आयोजक श्री. सदानंद गाडगीळ यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. या मेळाव्यासाठी ५०० हून अधिक समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी ब्रह्मवृंद श्री. विनोद गोरे, श्री. आनंद आठवले आणि श्री. अक्षय घुमास्ते यांनी शांतीपाठाचे पठण केले.

वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना

सूत्रसंचालक आणि आयोजक श्री. सदानंद गाडगीळ यांनी समय अधिकोष (टाईम बँक) अशी संकल्पना मांडली. यात वृद्धापकाळात केवळ दोघे किंवा एखादाच घरी रहात असल्याने साहाय्याची आवश्यकता असते. एखाद्याने १ किंवा २ घंटे साहाय्य करून इतरांना साहाय्य करावे. त्यांच्या दिलेल्या साहाय्याची नोंद करून ठेवण्यात येईल. ज्यांना साहाय्य केले त्याची नाेंद ठेवली जाईल आणि ज्यांना आवश्यकता आहे,  त्यांना ते साहाय्य दिले जाईल. असे करून एकमेकांना साहाय्य केल्यास ‘समय अधिकोष अर्थात टाईम बँके’चा वापर करावा.