‘गोमाता’ ही हिंदु धर्मात श्रेष्ठ समजली जाते. गोमातेचे महत्त्व आणि तिच्यामुळे होणारे लाभही पुष्कळ आहेत. गाय जरी मुका प्राणी असला, तरी तिला मानवाप्रमाणे भावना आहेत, याची प्रचीती नुकतीच एका उदाहरणातून आली. एक महिला एका गायीला प्रतिदिन पोळी खाऊ घालत असे. हा तिचा नित्यनेम कधीच चुकला नाही. एक दिवस त्या महिलेचा मृत्यू झाला. वैशिष्ट्यपूर्ण घटना म्हणजे महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही गाय तेथे उपस्थित होती. महिलेच्या अंत्ययात्रेसमवेत गायही चालत होती. ही घटना सर्वांनाच अचंबित करणारी आहे. एखाद्या पशूमध्ये हे प्रेम, आपुलकी, संवेदनशीलता येते कुठून ? अर्थात् ३३ कोटी देवतांचा वास असणार्या गायीमध्ये हे सर्व अंगीभूत असणारच, यात शंका नाही; म्हणूनच तर ती गोमाता ठरते. आई-मुलाचे नाते जसे असते, तसेच हे उदाहरण गोमातेचे त्या महिलेशी असणारे नाते उलगडून दाखवते. ती गाय पोळीसाठी आली नव्हती, तर त्या महिलेशी असणार्या एकनिष्ठतेमुळे तिने तिच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी उपस्थिती दर्शवली. गोमातेची काळजी घेणे, तसेच तिचे संरक्षण, संवर्धन करणे यांसाठी हे एकच उदाहरण बोलके आणि पुरेसे आहे. मानवाने दाखवलेल्या प्रेमाला जागणार्या अशा गायींना आपणही जपले पाहिजे.
सध्याची परिस्थिती तर आपण सर्वच जण जाणतो. माणूस माणसाला विचारत नाही. शेजारी रहात असूनही कित्येक कालावधीपर्यंत एकमेकांचे तोंडही पाहिलेले नसते. शेजारधर्मही पाळला जात नाही. तेथे अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणे तर दूरचीच गोष्ट आहे. ‘खाल्ल्या मिठाला जागणे’, ही संकल्पना काळाच्या ओघात संपुष्टात येत आहे. अशा स्थितीत गायीने मानवासमोर मोठा आदर्शच निर्माण केला आहे. मानवाने या घटनेची नोंद घ्यायला हवी; पण दुर्दैव म्हणजे आज त्याच गायीच्या मानेवर सुरा फिरवला जातो. गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असूनही त्याची कठोर कार्यवाही होत नाही. गायीला कापणे, म्हणजे ३३ कोटी देवता असणार्या हिंदु धर्माचा अवमानच करणे होय ! हिंदु आणि गोप्रेमी यांनी याविरोधात संघटित होऊन सरकारकडे गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विचारणा सातत्याने करायला हवी.
भारत शासनाने मध्यंतरी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ (गायीला मिठी मारण्याचा दिवस) घोषित केला होता. गायीला मिठी मारल्याने समृद्धी येते. आनंदात वाढ होते, असे अनेक लाभ आहेत; मात्र अनेकांनी या दिवसाला विरोध केल्याने याविषयीचा आदेश मागे घेण्यात आला, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा कणा असलेल्या गोमातेचे महत्त्व जाणण्यात अजूनही आपण न्यून पडतो, हेच सत्य यातून लक्षात येते !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.