‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics)चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘म्हातारपणी येणार्या अडचणी, ‘अल्झायमर्स डिसीज’ म्हणजे काय ? आणि तो होण्याची काही कारणे’ यांविषयी जाणून घेऊया.
१. म्हातारपणी येणार्या शारीरिक आणि मानसिक अडचणी
१ अ. इतरांकडून सतत साहाय्य मागावे लागणे : आपल्या सर्वांनाच म्हातारपण नकोसे वाटते. या वयात वयोमानानुसार येणारे आजारपण, थकवा, न्यून होत चाललेली स्मरणशक्ती, या सर्व शारीरिक अडचणी आहेतच, तसेच ‘इतरांकडून सतत साहाय्य मागावे लागणे’, ही सर्वाधिक मनाला त्रास देणारी गोष्ट आहे. आपल्याला इतरांकडून साहाय्य मागण्याचा नेहमीच कंटाळा येतो. आपल्या मनात ‘इतर काय म्हणतील ? त्यांना काय वाटेल ?’, असे अनेक विचार असतात. म्हातारपणी सतत इतरांचे साहाय्य लागते. त्या वेळी ‘मनाची स्थिती कशी होत असेल ?’, याचा विचार न केलेला बरा.
१ आ. मेंदूतील स्मरणशक्ती विषयीच्या क्रिया करणार्या भागात बिघाड झाल्यास एखादी गोष्ट लक्षात ठेवणे कठीण जाणे : आपला मेंदू म्हणजे सहस्रो नसांचे जाळे असते. अनेक नसा एकमेकांच्या संपर्कात येऊन आवश्यक त्या विद्युत् आवेगांची देवाण-घेवाण करतात आणि योग्य त्या क्रिया घडवून आणतात. प्रत्येक क्रियेसाठी मेंदूचा वेगवेगळा भाग कार्य करतो. ‘अन्नपचन आणि श्वसन’ यांसारख्या मोठ्या क्रिया अन् ‘भावना व्यक्त होणे, लक्षात रहाणे किंवा आठवणे’, यांसारख्या सूक्ष्म क्रिया यांच्या संदर्भातही असेच असते. मेंदूतील स्मरणशक्तीविषयीच्या क्रिया करणार्या भागात बिघाड झाल्यास आपल्याला लक्षात ठेवणे कठीण होऊ लागते.
१ इ. ‘अल्झायमर्स डिसीज’ (Alzheimer’s Disease) या रोगाची लक्षणे : वयोमानानुसार सर्वसाधारणपणे ‘विसरायला होणे’ आणि ‘विसरण्याचा रोग होणे’ या दोन भिन्न गोष्टी आहेत. वयोमानानुसार काही विशिष्ट सूत्रे, उदा. नातेवाइकांची नावे, घराचा पत्ता इत्यादी नेहमी स्मरणात असलेल्या गोष्टींचा विसर पडतो. याउलट विसराळूपणाचा रोग झाल्यावर आताच केलेल्या कृती विसरणे, बोलतांना शब्द न सुचणे, संवाद साधण्यास अडचण येणे, इत्यादी अधिक तीव्रतेचे त्रास होतात. नेहमीच्या कृती उदा. दात घासणे, जेवणे वा अन्य स्वतःच्या कृतीही विसरायला होतात. व्यक्तीला चालणे, उठणे, बसणे या क्रिया करायला जमत नाही आणि व्यक्ती इतरांवर पूर्णपणे अवलंबून रहाते. या रोगाला ‘अल्झायमर्स डिसीज’ (Alzheimer’s Disease) असे म्हणतात आणि विस्मरणाच्या अनेक रोगांपैकी हा सर्वाधिक आढळणारा रोग आहे.

२. ‘अल्झायमर्स डिसीज’ होण्याची काही कारणे
परावलंबनाची भयावह चाहूल देणारा हा रोग होण्यामागे अनेक कारणे आहेत. यांमध्ये ‘चुकीची जीवनशैली’ हे एक प्रमुख कारण आहे. चुकीचा आहार किंवा योग्य वेळेत न जेवणे, व्यसने, झोप न होणे, बैठी जीवनशैली (शारीरिक हालचालींची न्यूनता), तसेच वातारणातील प्रदूषण, ही अनेक कारणांपैकी काही प्रमुख कारणे आहेत. यासह उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक तणाव हे त्रास असणार्या व्यक्तींना हा रोग होण्याची शक्यता अधिक असते.
३. म्हातारपणी स्मरणशक्ती लोप पावण्याची कारणे
अ. वयोमानानुसार मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह न्यून होऊन मेंदूचा आकार आणि कार्य करण्याची क्षमता न्यून होत जाते. त्यामुळे नसांची निर्मिती नैसर्गिकपणे होत नाही.
आ. अनेक नसांवर ‘अमीलॉइड अल्फा’ नामक प्रथिनांचे आवरण येऊ लागते अन् त्या नसा जीवित असूनही निकामी होतात.
इ. विविध कारणांमुळे मेंदूतील नसांना सूज येऊन त्या मृत पावू लागतात.
ई. एकीकडे नसांची निर्मिती थांबून नसा मृत होणे आणि उपलब्ध नसांवर आवरण येणे, यांमुळे कार्य करणार्या नसांची संख्या न्यून होते.
या सर्व कारणांमुळे म्हातारपणी स्मरणशक्ती लोप पावू लागते.’
(क्रमशः १४ फेब्रुवारी या दिवशी)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा गोवा. (५.२.२०२५)
या मालिकेतील आधीचे लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा →
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise