‘१५.११.२०२२ या दिवशी दैवी सत्संगात ‘संत तुकाराम महाराज यांच्यासाठी विठ्ठल कसा धावून आला ?’, याविषयी एक कथा सांगितली होती. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. सत्संगात प्रथम सत्रात साधिका आत्मनिवेदन करत असतांना भावजागृती होणे आणि आनंद जाणवणे
सत्संगात प्रथम सत्रात ‘साधकांनी आदल्या दिवशी दिलेल्या ध्येयानुसार काय प्रयत्न केले ?’, याविषयी सांगितले. तेव्हा कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे) आत्मनिवेदन करतांना वातावरणात आनंद जाणवत होता. कु. सुवर्णा श्रीराम आत्मनिवेदन करतांना सर्वांची भावजागृती होत होती.
२. ‘सत्संगात प्रत्येक साधकातील देव आपल्याशी बोलत आहे’, असा भाव ठेवला, तर शिकण्याच्या स्थितीत रहाता येणे
त्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सुचले, ‘आपण सत्संगात अन्य साधकांनी केलेले आत्मनिवेदन ऐकतो. त्यांचे आत्मनिवेदन केवळ ऐकण्यासाठी नसते, तर ‘प्रत्येक साधकातील देव आपल्याला विविध प्रयत्न सांगत असून साधकांमधील देव आपल्याशी बोलत आहे’, असा भाव ठेवल्याने आपण शिकण्याच्या स्थितीत राहू शकतो.’
३. सत्संगात नामाचा महिमा सांगणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक (वय १३ वर्षे) !
यानंतर कु. प्रार्थना पाठक हिने सत्संगात नामाचा महिमा सांगितला. तिने सांगितले, ‘‘भक्त भगवंताचे नाम अाणि भक्ती यांमध्ये तल्लीन झाल्यास भगवंत भक्ताची सर्वतोपरी काळजी घेतो. त्यामुळे आपण देहभान विसरून नामजपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. देवाप्रती उत्कट भाव वाढवल्याने देव हाकेला सत्वर धावून येतो.’’
४. सत्संगात साधिकांनी केलेले आत्मनिवेदन
४ अ. कु. वैदेही सावंत (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १४ वर्षे)
४ अ १. देवालाच ‘साधकांमध्ये भक्तीभाव निर्माण कर’, असे सांगणे : ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी विठ्ठलाच्या पाषाणाच्या मूर्तीला पेढा भरवला आणि त्यांच्यातील अत्युच्च भक्तीमुळे विठ्ठलाने तो पेढा खाल्ला. तेवढी तर आपली भक्ती नाही; म्हणून आपण देवालाच प्रार्थना करूया. देवा, ‘तूच आमच्यात भक्ती आणि भाव निर्माण कर.’
४ आ. कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १६ वर्षे)
४ आ १. प्रत्येक नामातून कृतज्ञताभाव जागृत व्हायला हवा ! : ‘देवाने आपल्यासाठी किती दिले आहे ! ‘प.पू. गुरुदेव आपल्यासाठी किती करत आहेत !’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली. प्रत्येक नामातून कृतज्ञताभाव जागृत व्हायला हवा.’
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
प.पू. गुरुदेव, ‘आपल्याच कृपेमुळे नाम आणि भक्ती यामध्ये कसे तल्लीन व्हायचे ?’ हे मला शिकायला मिळाले. ‘आम्हाला आपल्या नामात असेच तल्लीन होता येऊ दे’, अशी मी आर्तभावाने प्रार्थना करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) फोंडा, गोवा. (२६.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |