१. नामजपामुळे धर्मप्रेमींची साधनेवरील श्रद्धा वाढणे
‘एकदा मी सोलापूर येथील एका धर्मप्रेमी व्यक्तीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांचा परिचय करून घेतला. धर्मप्रेमींच्या घरातील स्थिती लक्षात आल्यावर मी त्यांना कुलदेवीचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला, तसेच घरातील प्रत्येक खोलीमध्ये वास्तूछतही लावायला सांगितले. मी त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने वापरण्यास सुचवले. त्यामुळे त्यांना अनुभूती येऊन त्यांची साधनेवरील श्रद्धा वाढली.
२. एका धर्मप्रेमींची मुलगी अशक्त असणे, धर्मप्रेमी व्यक्ती ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करू लागल्यावर ती एका अंगावर (कुशीवर) वळू लागणे

एका धर्मप्रेमीच्या पत्नीला उशिरा मुलगी झाली. त्यांचे बाळ पुष्कळ अशक्त होते आणि ते ६ मासांचे झाले, तरी कुशीवर वळत नव्हते. आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) औषधांनीही त्यावर उपचार होत नव्हते. नंतर ते धर्मप्रेमी दादा धर्मशिक्षणवर्गात येऊ लागले आणि त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप चालू केला. तेव्हा त्यांची मुलगी एका अंगावर (कुशीवर) वळू लागली आणि तिला हळूहळू उठून बसताही येऊ लागले. आता ते दादा नियमित साधना आणि सेवा करू लागले आहेत. ‘सेवेत खंड पडू नये आणि अधिकाधिक लोकांपर्यंत साधनेचे महत्त्व पोचवता यावे’, अशी त्यांना तळमळ असते.
(‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपामुळे घरात आणि कुटुंबियांना होत असलेला पूर्वजांचा त्रास न्यून झाला. त्यामुळे मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.’ – संकलक )
३. हिंदुत्वनिष्ठांनी नामजपाचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवल्याने त्यांची नामजप, भगवंत आणि गुरुदेव यांच्यावरील श्रद्धा वाढणे
एक हिंदुत्वनिष्ठ प्रतिदिन त्यांच्या घरात भ्रमणभाषवर साधकांच्या आवाजातील दत्तगुरूंचा नामजप एक घंटा लावतात. एके दिवशी ते एका निर्जन ठिकाणी गेले असता २ मोठे श्वान (कुत्रे) त्यांच्या अंगावर धावून आले. त्यांना वाटले, ‘आता आपण संपलो.’ त्यांच्या मुखातून अकस्मात् ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे शब्द निघाले आणि ते दोन्ही श्वान एकदम शांत झाले. काही वेळाने तेथे काही लोक आले आणि म्हणाले, ‘‘आज तुम्ही वाचलात ! हे श्वान कुणालाच सोडत नाहीत.’’ या प्रसंगानंतर त्यांची नामजप, भगवंत आणि गुरुदेव यांच्यावरील श्रद्धा वाढली. आता ते पुढाकार घेऊन तळमळीने सेवा करत आहेत.
या हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीच्या वडिलांचे निधन झाले. ते कळल्यावर मी त्यांची आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना श्राद्धविधींचे शास्त्र, तसेच दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगितले. त्यामुळे त्यांना पुष्कळ आधार वाटला.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आपणच माझ्याकडून हे प्रयत्न करून घेत आहात. याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. राजश्री देशमुख, सोलापूर सेवाकेंद्र, सोलापूर. (८.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |