अमेरिकेत जाणारे अवैध स्थलांतरित आश्रयासाठी सादर करतात खोटे प्रतिज्ञापत्र !

अमेरिकेत गेल्यावर प्रतिज्ञापत्राद्वारे करतात ‘व्हिसा’ देण्याची विनंती !

अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना तेथून परत पाठवले जात आहे

कर्णावती (गुजरात) – अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना तेथून परत पाठवले जात आहे. १०४ जणांना काही दिवसांपूर्वीच भारतात परत पाठवण्यात आले. या भारतियांनी अमेरिकेत जाण्यासाठी वेगवेगळ्या अवैध मार्गांचा वापर केला होता. तेथे जाण्यापूर्वी त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या भारतियांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचेही आता समोर आले आहे. यातील काही माहिती पुढीलप्रमाणे आहे :

१. मी भाजप किंवा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे अन् विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मला आणि माझ्या कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मला देश सोडणे भाग पडत आहे. स्थानिक पोलिसांत तक्रारही नोंदवलेली नाही.

२. मी हिंदु किंवा मुसलमान भागाजवळ रहात होतो आणि तेथे एका मुलीशी किंवा मुलाशी माझे प्रेम झाले. तेथे अन्य धर्माचे लोक अधिक होते अन् त्यांच्या कुटुंबातील लोक मला मारण्यासाठी येत आहेत.

३. माझ्या पत्नीवर अन्य समाजाच्या लोकांनी आक्रमण केले आणि आम्हाला पळून जावे लागले किंवा आता जीव वाचवण्यासाठी देश सोडावा लागला; कारण ते लोक आक्रमण करण्यासाठी पुन्हा येत आहेत.

४. गावात दोन समुदायांत वाद आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा वडील नेते आहेत. दुसर्‍या समाजातील लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीसही काही करत नाहीत.

५. कोरोना महामारीच्या काळात व्यवसाय बंद झाला. कोणतेही साहाय्य नाही. मोठे कर्ज असून कर्जवसुली करणारे आता जिवावर उठले आहेत. पोलीस साहाय्य करत नाहीत. त्यामुळे कुटुंबासमवेत देश सोडण्यासाठी निघालो.