३ वर्षांत १ सहस्र १५७ दलालांवर कारवाई, तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याच्या प्रकरणी ७९२ गुन्हे नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – प्रशासनाने मागील ३ वर्षांत १ सहस्र १५७ दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण ५५ लक्ष ४१ सहस्र रुपये रक्कम दंड स्वरूपात जमा केली आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याच्या प्रकरणी ७९२ प्रकरणे प्रविष्ट (दाखल) करून संबंधितांकडून १५ लक्ष रुपये रक्कम दंड स्वरूपात जमा करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात एका प्रश्नावर लेखी स्वरूपात ही माहिती दिली. मडगावचे भाजपचे आमदार दिगंबर कामत यांनी हा प्रश्न विचारला होता.

उत्तरात पुढे म्हटले आहे की, समुद्रकिनार्‍यावर अनधिकृतरित्या वस्तूंची विक्री करतांना पर्यटकांची सतावणूक करणार्‍या प्रत्येकाला ५ सहस्र रुपये दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या ४० दलालांनी दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे. दक्षिण गोव्यात समुद्रकिनार्‍यावर वाहन चालवल्याच्या प्रकरणी ६ जणांना कह्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.