
कोल्हापूर, १० फेब्रुवारी (वार्ता.) – महापालिकेच्या विविध शाळांमधून शिक्षण घेणार्या ५६ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता सूचीत स्थान मिळवले आहे. यांपैकी २१ विद्यार्थी १० फेब्रुवारीला बेंगळुरू येथील ‘इस्रो’(इंडियन स्पेस रिसर्च सेंटर) ला भेट देण्यासाठी विमानाने रवाना झाले. त्यांच्यासमवेत २ शिक्षिका, १ अधिकारी आणि १ आधुनिक वैद्यही गेले आहेत. तत्पूर्वी महापालिकेच्या आवारात या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे आमदार श्री. अमल महाडिक, शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे युवानेते श्री. पुष्कराज क्षीरसागर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. ‘इस्रो’ची माहिती घेण्यासाठी निवड झालेली कोल्हापूर ही राज्यातील एकमेव महापालिका आहे.
या विद्यार्थ्यांना उपग्रहाकडून पृथ्वीवर संदेश कसे येतात, तसेच इस्रोचे कामकाज पहाण्याची संधी मिळणार आहे. उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन, तसेच भारतीय बनावटीची ‘मॉडेल्स’ त्यासमवेत ‘पंडित जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियम’मध्ये ‘थ्रीडी शो प्लेनोटेरियम’ पहावयास मिळणार आहे. इथून पुढेही महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी, असे विशेष उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती उपायुक्त साधना पाटील यांनी दिली. पालकांनीही त्यांच्या मुलांना नजिकच्या महानगरपालिका शाळेमध्ये प्रवेश घेऊन विविध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाधिकारी आर्.व्ही. कांबळे यांनी केले आहे.