झाराप येथील अनधिकृत उपाहारगृह हटवले

झाराप ग्रामपंचायतीच्या नोटिसीनुसार पोलीस प्रशासनाची कारवाई

कुडाळ – झाराप झिरो पॉईंट येथे असलेल्या उपाहारगृहाची कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही. त्यामुळे हॉटेल कुडाळ पोलीस ठाणे यांच्या संदर्भीय पत्रानुसार तात्काळ हटवण्यात यावे, अशी नोटीस झाराप ग्रामपंचायतीने हॉटेलशी संबंधित तनवीर करामत शेख यांना बजावली. या नोटिसीनुसार कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात ते उपाहारगृह १० फेब्रुवारीला सायंकाळी काढून टाकण्यात आले.

६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सकाळी ६.३० च्या सुमारास या उपाहागृहात पुण्यातील पर्यटकाने चहामध्ये माशी पडल्याने त्या चहाचे पैसे देणार नसल्याचे सांगितल्यावर वाद झाला. त्यानंतर त्या पर्यटकाचे हात-पाय बांधून त्याला मारहाण करण्याची घटना २ दिवसांपूर्वी घडली होती. यानुसार कुडाळ पोलिसांनी ६ जणांवर गुन्हे नोंद करत यातील तिघांना अटक केली होती. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अन्नभेसळ विभागाला त्या उपाहारगृहाची चौकशी करून ते अनधिकृत असल्यास त्याला टाळे ठोकण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनीही १२ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न केल्यास स्वतः ते उपाहारगृह काढून टाकू, अशी चेतावणी दिली होती.

झाराप ग्रामपंचायतीने त्वरित कारवाई करत संबंधित उपाहारगृहाच्या मालकाला अनधिकृत बांधकाम हटवण्याविषयी आदेश दिले होते.

संपादकीय भूमिका

एका पर्यटकाला अमानुष मारहाण झाल्यानंतर जागी झालेली झाराप पंचायत !