स्थानांतराच्या जागी रूजू व्हा, तरच मिळेल फेब्रुवारी मासाचे वेतन ! – पोलीस मुख्यालय अधीक्षक

स्थानांतर केल्यानंतरही २३० पोलीस जुन्याच जागी असल्याचे प्रकरण

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा पोलिसांनी वर्ष २०२४ मध्ये ३ निरनिराळे आदेश काढून उपनिरीक्षक ते हवालदार पदांवरील १ सहस्र ३८४ जणांचे स्थानांतर केले होते; मात्र अद्याप यातील २३० जण नवीन जागी रूजू झालेले नाहीत. त्यामुळे महासंचालकांच्या आदेशानुसार संबंधितांना नवीन जागी रूजू झाल्यानंतरच फेब्रुवारीचे वेतन मिळणार, असा बिनतारी संदेश पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी नुकताच पाठवला आहे.

पोलीस दलाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापैकी २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी २६४ जणांची, ११ जुलै २०२४ या दिवशी ४१६ जणांची आणि २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी ७०४ जणांची मिळून एकूण १ सहस्र ३८४ जणांचे स्थानांतर केले होते; मात्र काही कर्मचार्‍यांनी नवीन ठिकाणी रूजू न होता जुन्याच ठिकाणी पुन्हा स्थानांतर करून घेतले आहे. विशेष म्हणजे १ सहस्र ३८४ पैकी २३० जण अद्यापही त्यांच्या जुन्याच ठिकाणी कार्यरत आहेत. पोलीस खात्याने प्रत्येक वेळी बिनतारी संदेश पाठवून संबंधितांना नवीन ठिकाणी रूजू होण्याचे आदेश दिले होते, तरीही याचे पालन झालेले नाही. याची पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधित पोलीस कर्मचारी स्थानांतराच्या ठिकाणी रूजू होत नाहीत, तोपर्यंत स्थानांतरासंबंधी नवीन आदेश काढू नये, अशी सूचना पोलीस मुख्यालयाला केली आहे. यामुळे २३० कर्मचार्‍यांना नवीन जागी रूजू होण्याविना दुसरा पर्याय राहिलेला नाही.

संपादकीय भूमिका

  • खात्याचा आदेशही न पाळणारे असे अप्रामाणिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे खात्याला कलंकच !
  • स्थानांतराच्या ठिकाणी रूजू व्हावे, यासाठी वेतन न देण्याची कारवाई करावी लागणे संबंधितांसाठी लज्जास्पद !