नवीन देवस्थान समित्यांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – समाजाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक घडी व्यवस्थित ठेवण्यात देवस्थान समित्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन समित्यांनी देवस्थानच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. देवस्थान समित्यांच्या निवडणुका ९ फेब्रुवारी या दिवशी पार पडल्या. काही किरकोळ अपवाद वगळता बहुतांश देवस्थान समित्यांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरून देवस्थान समित्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘देवस्थानचे व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाज सांभाळण्याचे कार्य देवस्थान समित्यांचे आहे. देवस्थानच्या योग्य व्यवस्थापनाबरोबर भाविकांना योग्य त्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे. समाजात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकोपा टिकवून ठेवण्यातसुद्धा देवस्थान समित्यांना महत्त्वाची भूमिका वठवावी लागणार आहे. सांस्कृतिक केंद्र म्हणून देवस्थानची प्रतिमा सिद्ध व्हावी. आपल्या मंदिरांचा समृद्ध वारसा पर्यटकांपर्यंत पोचवण्याचे काम देवस्थान समित्यांनी करायला हवे, यासाठी आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी.’’