वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी प्रयागराजमध्ये लाखो भाविकांना एकाच जागी थांबवले !
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज
प्रयागराज – येथील महाकुंभात त्रिवेणी संगम येथे स्नान करण्यासाठी येणार्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून भाविकांना नियंत्रित करण्यात प्रशासनावर कमालीचा ताण आहे. गेल्या ३ दिवसांत प्रयागराज येथे १५ लाख वाहने आली आहेत. आताही प्रत्येक तासाला ८ सहस्र वाहने प्रयागराज येथे येत आहेत. विशेष म्हणजे प्रयागराजपासून ३०० किलोमीटर अंतरावर प्रयागराज येथे न जाण्याविषयीच्या सूचना पोलीस भाविकांना देत आहेत. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाले आहेत.
प्रयागराजमधील चित्र !
१. वसंतपंचमीचे संगमस्नान शेवटचे अमृत स्नान होते. ते झाल्यानंतर आता मर्यादित संख्येत भाविक येतील, अशी प्रशासनाची अपेक्षा होती; मात्र गेल्या १० दिवसांपासून जमलेल्या गर्दीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ९ फेब्रुवारी या दिवशी १ कोटी १० लाख भाविकांनी संगमतिरी स्नान केले आहे. यावरून भाविकांच्या संख्येत किती वाढ झाली आहे, याचा अनुमान येऊ शकतो.
२. महाकुंभक्षेत्री असलेल्या बहुतांश आखाड्यांनी आता प्रस्थान केले आहे. तरी १२ फेब्रुवारीच्या माघ पौर्णिमेच्या पर्वस्नानासाठी भाविकांची संख्या वाढत आहे.
३. प्रयागराज येथे वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना लाखो भाविकांना एकाच जागी थांबवावे लागले आहे.
४. प्रयागराज शहरात प्रवेश करण्यासाठी ७ मार्ग आहेत. तरीही ५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना ८ तास लागत आहेत.
५. प्रयागराज येथून देहली येथे जाण्यासाठी १२ तास लागतात; मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यानां ३० तासांहून अधिक कालावधी लागत आहे.
६. रिवा, चित्रकूट, मिर्झापूर, वाराणसी, जौनपूर, लक्ष्मणपुरी, प्रतापगड, कानपूर, कौशांबी येथून प्रयागराज येथे येणार्या रस्त्यांवर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
उत्तर भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची भयावह गर्दी !
केवळ रस्त्यांवरच नव्हे, तर सर्व रेल्वे स्थानकांवर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच केवळ उत्तरप्रदेशच नव्हे, तर बिहार, मध्यप्रदेश, देहली येथील सर्व रेल्वे स्थानकांवर भाविकांची प्रचंड गर्दी आहे. गर्दीमुळे अगोदर आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वेत चढताही येत नाही आहे. साधे तिकीट काढलेले प्रवासी आरक्षण आणि वातानुकुलित डब्यात घुसून जागा मिळवत आहेत. त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत, तसेच रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासनीस दिसून येत नाहीत.
वाराणसी आणि अयोध्या येथेही भाविकांची प्रचंड गर्दी !
प्रयागराज येथून भाविक वाराणसी आणि अयोध्या येथे जात असल्याने तेथेही भाविकांचा महापूर आला आहे. सुविधा मिळणार नसल्याने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने भाविकांना अयोध्येत न येण्याचे आवाहन केले होते. तरीही भाविक अयोध्या येथे येत आहेत. (शिस्तीचे पालन न करणार्या, तसेच सरकारच्या सूचनांना धाब्यावर बसवणार्या भाविकांचे वर्तन भारतासाठी लज्जास्पद नाही का ? – संपादक)