‘यू ट्यूबर’ रणवीर अलाहबादिया याच्या विरोधात तक्रार !

  • पालकांविषयी खासगी प्रश्न विचारल्यावरून समाजातून मोठी टीका

  • तक्रारीनंतर रणवीर यांनी मागितली क्षमा

  • मुख्यमंत्र्यांनी सुनावले !

रणवीर अलाहबादिया

मुंबई – विनोदवीर (कॉमेडियन) समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमात रणवीर अलाहबादिया याने स्पर्धकाला आई-वडिलांविषयी अत्यंत खासगी प्रश्न विचारल्याने त्याच्यावर सर्व माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. वरील कारणावरून आयोजकांसह त्याच्यावर मुंबई पोलिसांमध्ये अधिवक्ता आशिष राय आणि पंकज  मिश्रा यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘आई-वडिलांना शारीरिक संबंध ठेवतांना बघायला आवडेल कि त्यांना साथ द्यायला आवडेल’ अशा प्रकारचा, भारतीय माणूस कल्पनाही करू शकत नाही, असा अत्यंत निषेधार्ह प्रश्न रणवीर याने या कार्यक्रमातील स्पर्धकाला विचारला. तक्रारीनंतर रणवीर यांनी क्षमा मागितली आहे.

देवेंद्र फडणवीस

यापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते रणवीर अलाहबादिया याला पुरस्कार देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; परंतु एखाद्याला दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही. अभिव्यक्तीची मर्यादा आहे. आपल्या समाजात अश्लीलतेचे नियम आहेत. त्याची मर्यादा ओलांडता येत नाही’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अभियंता रणवीर अलाहबादिया हा ६ यू-ट्यूब वाहिन्यांचा मालक आहे. ‘बीयर बाय सेप्स’ या त्याच्या यू-ट्यूब वाहिनीचे १२ मिलियन प्रेक्षक आहेत. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनीही या संदर्भात टीका केली आहे. माध्यमांनीही या संदर्भात ‘प्रश्न लिहू शकत नाही’ इतका आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

  • नैतिकतेची परिसीमा ओलांडलेल्या अलाहबादिया यांच्या लोकप्रियतेचा विचार न करता त्यांना योग्य शिक्षा झाली, तर पुढे कुणी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून भारतीय संस्कृतीला धक्का लागेल, अशी वक्तव्ये किंवा कृती करणार नाही !
  • अशा प्रकारचे विधान केल्यानंतर केवळ क्षमा मागून त्याचे क्षालन होणार नाही, तर यासाठी रणवीर यांना शिक्षा होणे आवश्यक आहे !