साधनेत मौन पाळण्याचे महत्त्व !

‘मौनं सर्वार्थसाधनम् ।’ असे म्हणतात. व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात मौन पाळण्याचे पुष्कळ महत्त्व आहे. आपण स्वभावदोषांमुळे एखाद्या व्यक्तीशी रागाने किंवा प्रतिक्रियात्मक बोलतो, तेव्हा आपल्या बोलण्याने ती व्यक्ती दुखावली जाते. याउलट आपण त्या प्रसंगात मौन पाळले, तर आपला राग आपल्या नियंत्रणात रहातो. अयोग्य आणि नकारात्मक विचार अन् अनावश्यक बोलणे, यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. त्यामुळे साधकांचे मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी होते. त्यांच्या कृपेने मला मौनाविषयी पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

(पू.) शिवाजी वटकर

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला अनावश्यक बोलणे टाळण्यासाठी मौन पाळायला सांगणे

वर्ष १९८९ पासून मी मुंबई येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गाला जात असे. वर्ष १९९२ मध्ये आमच्या अभ्यासवर्गात नागोठणे, जिल्हा रायगड येथील एक साधक येत असत. ते अभ्यासवर्गात अनावश्यक बोलायचे आणि इतरांना शिकवत रहायचे. त्या वेळी त्यांच्या बोलण्यात अहंकार जाणवत असे. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाला मौन सांगितले. त्यामागे ‘साधकाने अंतर्मुख होऊन साधना करावी’, हा उद्देश होता. परात्पर गुरु डॉक्टर आरंभापासून साधकांना मानसिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करत असत.

२. मौन पाळल्याने होणारे लाभ  

२ अ. ईश्वरी चैतन्य मिळणे : मौन पाळल्याने साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर लाभ होतात. साधकांची ऊर्जा वाचून त्यांना ईश्वरी चैतन्य मिळते.

२ आ. मौनामुळे वादविवाद टळणे : आपण जेव्हा एखाद्याशी वादविवाद करतो किंवा भांडतो, तेव्हा समोरची व्यक्तीही तिच्या बोलण्यावर ठाम असते. त्या वेळी आपण ‘मौनं सर्वार्थसाधनम् ।’ असे म्हणून गप्प बसल्याने वादविवाद टळतात आणि वादविवादामुळे होणारे विपरीत परिणाम टाळता येतात.

२ इ. ऊर्जा आणि वेळ वाचणे : आपण अध्यात्मप्रसाराला गेल्यावर एखाद्या व्यक्तीचा देवावर विश्वास नसेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी वाद घालत असेल, तर आपण तिच्याशी बोलण्यात वेळ घालवू नये. बुद्धीप्रामाण्यवादी किंवा पुरोगामी यांच्याशी वादविवाद करत बसल्याने आपली ऊर्जा आणि वेळ वाया जातो. मौन पाळल्याने आपली ऊर्जा आणि वेळ वाचतो.

२ ई. संतांनी मौन धरले असले, तरी त्यांच्या केवळ सत्संगामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे शंकानिरसन होऊन मन शांत होणे : पू. विनोबा भावे अधूनमधून मौन पाळायचे. ते पुष्कळ ज्ञानी असल्याने त्यांच्याकडे अनेक जण प्रश्न घेऊन जायचे. त्यांचे मौन असल्यामुळे ते काहीच बोलत नसत. शेवटी लोक अस्वस्थ व्हायचे; परंतु ते मौनात असल्याने लोकही शांत बसून रहात असत. नंतर लोकांच्या लक्षात यायचे, ‘पू. विनोबा भावे यांच्या केवळ सत्संगाने त्यांच्या मनातील प्रश्न आपोआप सुटत आहेत आणि त्यांचे मन शांत होत आहे.’

३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी मौन पाळणे आवश्यक असणे

साधकाने प्रसंगी काया, वाचा आणि मन यांनी मौन पाळणे आवश्यक असते; मात्र अहंकारी व्यक्तीला ‘तिच्या बोलण्यामुळे घरातील किंवा बाहेरील सर्व कामे होतात’, असे वाटते. प्रत्यक्षात तसे नसते. प्रत्येक माणूस त्याच्या परीने विचार करून कृती करत असतो, तरीही व्यक्तीतील अहंमुळे तो समोरच्याला नको त्या गोष्टी सांगतो, सुचवतो आणि शिकवत असतो. आपण नाही बोललो, तरी देवाच्या कृपेने सर्व कामे होत रहातात, तरीही आपण ‘मी बोलतो, मी सांगतो, मी सुचवतो, मला चांगले येते’, असे वाटून कर्तेपणा घेत असतो. घरी किंवा कुठेही आपल्याला गप्प बसायचे असेल, तर समोरच्याला गप्प केले पाहिजे आणि समोरच्याला गप्प करण्यासाठी आपण प्रथम गप्प झाले पाहिजे. त्यासाठी काही साधकांना अंतर्मुख होण्यासाठी काही वेळा मौन पाळण्यास सांगतात.

शिष्याच्या आरंभीच्या काळात गुरु शिष्याला मार्गदर्शन करून, ग्रंथाभ्यासातून किंवा सत्संगातून शिकवतात. शेवटी शिष्य गुरूंशी एकरूप झाल्यावर ते त्याला मौनातून शिकवतात. ‘गुरूंनी मौनातून शिकवले आणि शिष्य मौनातून शिकला’, ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे. साधकांना मौनातून आणि सूक्ष्मातून साधना शिकवून ती करवून घेणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१०.२०२३)