
नगर – भगवान श्रीकृष्ण हेच पती आहेत. त्यांच्याविना अन्य कुणाचा विचारही न करणार्या संत मीराबाईंचे जीवन चरित्र भारतीय महिलांसह युवतींना प्रेरणादायीच आहे, असे पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांनी सांगितले. येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट द्वारे शहरात प्रथमच आयोजित केलेल्या ‘संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्या’चे द्वितीय पुष्प गुंफतांना नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते.
बाईंच्या जन्मापासूनचे प्रसंग बारकाईने निरूपण करतांना पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज म्हणाले, ‘‘बालपणी आईने गिरीधर गोपाल तुझे पती आहेत, असे मिराबाईला सांगितले. तेव्हापासून मीराबाई श्रीकृष्णाला पती मानत पतीच्या सान्निध्याचा, सेवेचा आनंद घेऊ लागली. ‘मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो ना कोई’ हा मीराबाईंचा भावच पुढे दृढ संकल्प होऊन श्रीकृष्णरूपात मीराबाईला विलीन होण्यास कारणीभूत ठरला.’’
शहरासह उपनगरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ‘संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्या’चा आनंद लुटला. ‘मीराबाईंचे चरित्र आजच्या काळातही मार्गदर्शन करते’, असे अभिप्राय उपस्थितांमधून उमटले.
पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज की,
१. विवाहासाठी मुलगी पहातांना तिचा सेवाभाव आणि मुलगा पहातांना त्याचा आदरभाव पहावा. विवाह संबंधात धनास प्राधान्य देवू नये. आपल्या घरासाठी कोणती मुलगी योग्य आहे, हे महिला नेमकेपणाने सांगू शकतात.
२. प्रत्येक मुलगी मातृत्व भाव घेऊनच जन्म घेते. स्त्रीने डोक्यावर पदर ठेवावा तो कधीही डोक्यावरून पडू देऊ नये. या भारतीय परंपरेमागे मोठे शास्त्र आहे. पदर घेणे हे सौभाग्याचे प्रतिक आहे. किमान पूजा-पाठ करतांना, मोठ्यांना नमस्कार करतांना डोक्यावर पदर घेतला तरच विशेष आशीर्वाद मिळतो.
३. पतीची कमाई कमी वाटणार्या महिला काम करतात. मला करिअर करायचे असे म्हणत नोकरी स्विकारून आई होण्याच्या सुखापासून दूर रहाण्यात आनंद मानतात. आई झाल्याच तर मुलासाठी वेळ देत नाहीत. मुलं सांभाळण्यास बाई ठेवतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलास स्वतः सांभाळत होती. दासींकडे मुलाला सोपवत नव्हती.
४. मुलांसाठी प्राधान्याने वेळ द्यावा. शिक्षकांना मुलांकडे ध्यान द्या असे न सांगता आपण मुलांच्या अभ्यासाकडे त्यांच्यावर सुसंस्कार करण्याकडे लक्ष द्यावे.
५. विमानातील एअर होस्टेस स्वतःचे दुःख बाजूला ठेवून जशी सदैव प्रसन्न रहाते, तसे सूनबाईने सदैव प्रसन्न राहिले पाहिजे. आपण समाजाला-देशाला आजपर्यंतच्या जीवनात काय दिले ? याचे चिंतन जन्मदिनी करावे.
६. मेणबत्या विझवत, केक कापत, सिनेमाची गाणी म्हणत, रात्रीच्या अंधारात जन्मदिन साजरे करू नये. घरातल्यांकडून औक्षण करून घेत मोठ्यांचे आणि मंदिरातील देवांचे आशीर्वाद घेत गोशाळांना चारा आणि अनाथांना मिष्टान्न भोजन देवून जन्मदिन भारतीय परंपरेप्रमाणे दिवसा साजरा करावा.
७. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत आपले चारित्र्य जपले पाहिजे. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत आपले जीवन खराब करून घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.