या उपक्रमामुळे मुले नेहमीपेक्षा अधिक आनंदी झाली !
डबवाली (हरियाणा) – येथील गंगा गावातील श्रीगुरु जांभेश्वर शिक्षा समिती संचालित प्राथमिक शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी प्रतिदिन त्यांच्या डब्यामध्ये गाय आणि पक्षी यांसाठी पोळी आणतात. शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत डबा आणतात. गेल्या एक वर्षापासून हा ‘पोळी दान उपक्रम’ चालू आहे. सकाळच्या प्रार्थनेनंतर ही पोळी पक्ष्यांना दिली जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी शाळेचे सर्व कर्मचारी मुलांसह गोठ्यात जातात. तेथे सर्व जण मिळून गायींची सेवा करतात. शाळेच्या कर्मचार्यांसह मुले महिन्यातून एकदा शाळा आणि आजूबाजूचे रस्ते स्वच्छ करतात. तलावासारख्या सार्वजनिक ठिकाणांहून प्लास्टिक आणि कचरा गोळा करतात. त्यामुळे मुले आजूबाजूच्या गोष्टींविषयी अधिक सजग आणि संवेदनशील बनली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात रमल्यामुळे ती भावनिकदृष्ट्या सक्षम झाली.
१. शाळा समितीशी संबंधित संत परमात्मानंद महाराज यांनी सांगितले की, मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी मोहीम चालू करण्यात आली आहे.
२. मुलांच्या पालकांनी सांगितले की, मुलांचा उत्साह पाहून बरे वाटते. त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धत पालटली आहे. आता ती नेहमीपेक्षा अधिक आनंदी आहेत.