आम्ही सावध होणार कि नाही ?

‘रामायण हे काल्पनिक काव्य आहे. तो इतिहास नाही’, असे उद्दामपणे निखालस खोटे लिहिणार्‍यांना आणि बोलणार्‍यांना ठणकावतांना गुरुदेव (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी) म्हणाले, ‘आमच्या हिंदु समाज जीवनाचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक , पारिवारिक, असे कोणतेही क्षेत्र असो, मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा असा अद्भुत अपूर्व प्रभाव आहे की, तो सहस्रो ‘सेक्युलरी’ (निधर्मी), समाजवादी शासने आली, तरी मिटणे असंभव आहे. आम्हा हिंदूंना रामाविना अन्य आहे तरी काय ? सर्वत्र रामच राम आहे.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

आमचा आत्मा हा आत्माराम आहे. हिंदु परिवारात जन्म झाला की, जन्म, विवाह सोहळा, काहीही मंगल प्रसंग असो, कोणताही उत्सव असो, रामजन्म, रामविवाह अशी गाणी असतात. मृत्यूनंतर शवयात्रेत ‘राम नाम सत्य है’ असते. परस्परांना अभिवादन करतांना ‘राम राम’ म्हणतात. मृत्यू झाला की, ‘राम’ म्हणतात. एखाद्यात काही दम नाही, अर्थ नाही. त्या अर्थाने आपण म्हणतो, ‘छे, हो ! त्याच्यात काहीच राम नाही.’ उत्तम औषधाला ‘रामबाण औषध’ किंवा ‘रामबाण उपाय’, असे म्हणतात. सर्वत्र ‘राम राम राम’ आहे. सर्वाेत्तम राज्यशासनाला ‘रामराज्य’ म्हणतात. भारताच्या कानाकोपर्‍यात, गावागावात राममंदिरे आहेत. लक्षावधी लोक प्रतिदिन रामायणाचा पाठ करतात, अयोध्या रामेश्वर, पंचवटी, चित्रकूट अशा यात्रा करतात. कोट्यवधी हिंदूंची नावे रामायणाशी संबंधित आहेत. हिंदु समाजाच्या नाडीत रक्ताप्रमाणे ‘राम’ सतत वहातो आहे. ईश्वराची जितकी नावे आहेत, त्यांत सर्वाधिक प्रसिद्ध ‘रामनाम’ आहे. काशीला जीवांना मुक्ती प्रदान करणारे शिवशंकर मृताच्या कानात रामनामाचा उपदेश करून त्याला मुक्ती देतात.

अशा भरतखंडाच्या घराघरात रामायणाचा जन्मोत्सव, नवरात्रादि कुळाचाराच्या अविच्छिन्न परंपरा असूनही या पाश्चात्त्य प्राच्य विद्यासंशोधक, मिशनरी आणि त्यांचे बूट चाटणारे आमचे आंग्लाळलेले भारतीय पंडित यांनी श्रीरामाच्या ऐतिहासिकतेवर शंकांच वादळ माजवावे ? आमचा केवढा प्रचंड ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) आहे. कोण ही भयंकर धर्मग्लानी ? आम्ही सावध होणार कि नाही ?

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’)