अनैतिक संबंधात अडसर ठरणार्या मुलाची आईकडून हत्या !
आई कि वैरीण ?
अहिल्यानगर – कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आईनेच प्रियकराच्या साहाय्याने पोटच्या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला.
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राजघराण्यातील लोकांना दाखवावा !
सुहास राजशिर्के यांची मागणी !
सातारा – शिर्के घराण्यातील सुहास राजशिर्के यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी प्रदर्शित होणार असलेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या संदर्भात सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राजघराण्यातील लोकांना दाखवावा. त्यात काही आक्षेपार्ह प्रसंग आढळल्यास तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. यासह ऐतिहासिक चित्रपटासाठी कायदा पारित करण्याची त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे.
पांडवगडावर मधमाशांचे गिर्यारोहकांवर आक्रमण !
सातारा – वाई मांढरदेव रस्त्यावरील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांनी आक्रमण केले. यात ६ गिर्यारोहक गंभीर घायाळ झाले. यातील दोघे घटनास्थळीच बेशुद्ध पडले. सर्वांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात आले. हे गिर्यारोहक इंदापूरवरून पांडवगडावर गेले होते. त्यांनी लावलेल्या अत्तराच्या (‘परफ्युम’च्या) वासाने मधमाशांचे पोळे विचलित झाले. यातूनच मधमाशांनी गिर्यारोहकांवर आक्रमण केले.