श्री तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी गर्भगृहाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ तात्काळ करा !

विविध पुजारी, भाविक, भक्त यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना निवेदन देतांना विविध पुजारी, भाविक, भक्त

धाराशिव – श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम चालू असून यात श्री देवीच्या गर्भगृहातील मूळ भिंतींवरील ग्रॅनाईट काढून एक मास झाला; मात्र अद्याप गर्भगृहाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झालेले नाही. हा विषय कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावनांशी संबंधित असून गर्भगृहासमवेत चोपदार गाभारा, सिंह गाभारा, तसेच भवानी शंकर सभामंडपातील शिळांनाही तडे गेलेले आढळून आलेले आहे. तरी ‘श्री तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी गर्भगृहाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ तात्काळ करावे आणि गाभारा प्रशस्त करावा’, या मागणीचे निवेदन विविध पुजारी, भाविक, भक्त यांनी १० फेब्रुवारीला धाराशिव जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना दिले. या प्रसंगी तुळजापूर शहरातून गोळा करण्यात आलेल्या ५ सहस्र २४० स्वाक्षर्‍यांचे निवेदनही देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सतत सततचे भूगर्भातून येणारे गुढ आवाज आणि भुगर्भात जाणवणारे हादरे यामुळे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ची मागणी करून एक मास झाला; मात्र त्यावर मंदिर प्रशासनाने कुठलीच कारवाई केलेली नाही. या संदर्भात तिन्ही पुजारी मंडळे, सर्व महंत सेवादार, शहरातील व्यापारी वर्ग, सर्व राजकीय आणि सामाजिक संस्था, नागरिक यांची याविषयी व्यापक बैठक होणे अपेक्षित होते; पण तीही अजूनपर्यंत झालेली नाही. आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारीला आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करू.

या प्रसंगी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुळजापूर शहरप्रमुख श्री. सागर इंगळे, सर्वश्री श्रीकृष्ण इंगळे, इंद्रजीत साळुंके, बाळासाहेब भोसले, मयूर कदम, जगदीश पलंगे उपस्थित होते.