
प्रयागराज, १० फेब्रुवारी (वार्ता.) – आदिगुरु शंकराचार्य यांचे समग्र जीवनपट उलघडणारे प्रदर्शन मध्यप्रदेश शासनाद्वारे कुंभक्षेत्रात तब्बल ३ एकर क्षेत्रात उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देणार्यांना आदिगुरु शंकराचार्य यांनी केलेल्या सनातन धर्माच्या पुनरुथ्थानाच्या कार्याचा परिचय होत आहे.
मध्यप्रदेशामध्ये आदिगुरु शंकराचार्य यांना ओंकारेश्वर येथे गुरूंची भेट झाली. त्या ओंकारेश्वर येथे मध्यप्रदेश शासनाद्वारे आदिगुरु शंकराचार्य यांचे जीवनपट उलगडणारे भव्य संग्रहालय निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. ओंकारेश्वर या ठिकाणी आदिगुरु शंकराचार्यांची १०८ फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. ओंकारेश्वर येथे असलेल्या एकात्म धाम या संग्रहालयाची प्रतिकृती कुंभक्षेत्रात उभारण्यात आली आहे. महाकुंभक्षेत्रात उभारण्यात आलेल्या या शिबिराच्या प्रवेशद्वारावरही आदिगुरु शंकराचार्यांची मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली आहे. या शिबिरामध्ये यज्ञशाळाही बांधण्यात आली असून वेदपाठशाळेतील पुरोहितांद्वारे नियमित येथे होमहवन केले जात आहे. आदिगुरु शंकराचार्य यांच्याविषयी ग्रंथप्रदर्शनीही येथे आहे.