मजुराची वादातून हत्या
डोंबिवली – येथील पंडित दिनदयाळ मार्गावर चालू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी ७ फेब्रुवारीच्या रात्री २ मजूर आणि इतर यांच्यामध्ये जेवण सांडल्यावरून वाद झाला. या वादातून एका मजुराने रात्रीच्या वेळेत त्याच्या सहकारी मजुराची डोक्यात बांबू मारून हत्या केली. या घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
‘डेटिंग ॲप’द्वारे तरुणाकडून व्यापार्याची फसवणूक
नवी मुंबई – संजय कैलासचंद मिना (वय २४ वर्षे) याने महिला असल्याचे भासवून घणसोली येथे रहाणार्या ५४ वर्षीय व्यवसायिकाला गंडा घातला. ‘डेटिंग ॲप’द्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याने त्याच्याकडून तब्बल ३३ लाख ३७ सहस्र रुपये उकळले. आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी डेहराडून येथून अटक केली. त्याने उकळलेल्या पैशांतून महागडी चारचाकी विकत घेऊन वेगवेगळ्या राज्यांतील तरुणींवर पैसे उधळले होते.
अंबाजोगाईत घरफोडी !
बीड – अंबाजोगाई शहरातील विमलसृष्टी परिसरात साडेचार लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
कळंबोली सर्कलजवळील मार्ग ६ मास बंद
मुंबई – कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम्.एस्.आर्.सी.) नवीन उड्डाणपूल आणि ‘अंडरपास’ बांधण्याचे काम यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा ‘एक्झिट’ मार्ग कळंबोली ‘सर्कल’मधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
केजरीवालांचा बुरखा फाडला ! – फडणवीस
मुंबई – निकालाच्या माध्यमातून देहलीकरांनी पंतप्रधानांच्या कामावर विश्वास दाखवला आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाडला आहे. भाजप शासन देहलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. खोटी आश्वासने देत जनतेची फसणूक करत त्यांनी राज्य केले. हे विकासाला दिलेले मत आहे, असेही ते म्हणाले,
प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या चित्रीकरणकक्षात चोरी
मुंबई – प्रसिद्ध संगीतकार आणि गायक प्रीतम चक्रवर्ती यांच्या चित्रीकरणकक्षात काम करणारा आशिष सायाल याने लाखो रुपयांची बॅग घेऊन पलायन केले. या प्रकरणी संगीतकार प्रीतम चक्रवर्तीने तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुपारी २ वाजता चोरीचा प्रकार घडला. या प्रकरणावर प्रीतम चक्रवर्ती यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.