पर्वरी पोलिसांकडून पूजा नाईक यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेतल्याच्या प्रकरणी आतापर्यंत एकूण ३ आरोपपत्रे प्रविष्ट

पूजा नाईक

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – सरकारी नोकरीसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी जुने गोवे येथील संशयित पूजा नाईक यांच्यासह प्रियोळ, म्हार्दाेळ येथील संशयित अजित सतरकर (वय ४९ वर्षे) आणि अनिषा सतरकर (वय ४७ वर्षे) मिळून एकूण ३ जणांच्या विरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ११३ पानी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या आरोपपत्रात ६ साक्षीदारांचा समावेश आहे.

संशयित अजित सतरकर आणि अनिषा सतरकर यांनी सरकारी खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी तक्रारदार प्रिया मांद्रेकर यांच्याकडून ४ लाख रुपये घेतले होते. प्रिया मांद्रेकर यांनी ही रक्कम स्वत:च्या पतीच्या अधिकोषातील खात्यावरून अजित सतरकर आणि अनिषा सतरकर यांच्या अधिकोषातील खात्यामध्ये जमा केली होती. ही रक्क्म २०२१ मध्ये देण्यात आली होती; मात्र प्रिया मांद्रेकर यांना सरकारी नोकरी देण्यास संशयित अपयशी ठरले होते.

याविषयी पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर संशयित अजित सतरकर आणि अनिषा सतरकर यांनी ही रक्कम संशयित पूजा नाईक हिच्याकडे सोपवल्याची माहिती पोलीस अन्वेषणात दिली होती. यामुळे पोलिसांनी तिन्ही संशयितांना कह्यात घेतले होते. संशयित पूजा नाईक यांच्या विरोधात अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत नोंद झालेले आहेत. सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेतल्याच्या अन्य एका प्रकरणी पर्वरी पोलिसांनी मेरशी येथील संशयित गौतम अस्नोटकर यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. संशयित गौतम अस्नोटकर यांनी या प्रकरणी पीडितांकडून सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने ५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी १२८ पानी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यापूर्वी फोंडा पोलिसांनी सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेतल्याच्या प्रकरणी अन्य एका प्रकरणात संशयितांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. सरकारी नोकरीसाठी पैसे घेण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत ३ आरोपपत्रे प्रविष्ट झालेली आहेत.

सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणी २ वर्षांमध्ये एकूण ४१ गुन्हे नोंद

पणजी – सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणी वर्ष २०२३ मध्ये ७, तर वर्ष २०२४ मध्ये ३४ मिळून एकूण ४१ गुन्हे नोंद झालेले आहेत. यामधील वर्ष २०२३ मधील ४, तर वर्ष २०२४ मधील २ गुन्ह्यांचे अन्वेषण पूर्ण झाल्यामुळे संबंधितांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. फातोर्डाचे ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई आणि
बाणावलीचे ‘आप’च आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत यासंबंधी एक अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ मध्ये म्हापसा पोलिसांनी २, तर कोलवाळ, डिचोली, मायणा-कुडतरी, वाळपई आणि वेर्णा पोलिसांनी प्रत्येकी १ गुन्हा नोंद केला आहे. वर्ष २०२४ मध्ये वास्को पोलिसांनी सर्वाधिक ७; डिचोली ६; पणजी ४; आगशी आणि फोंडा प्रत्येकी ३; काणकोण, पर्वरी आणि म्हार्दाेळ प्रत्येकी २ गुन्हे, तर मडगाव, मुरगाव, जुने गोवे, म्हापसा आणि कोलवाळ पोलिसांनी प्रत्येकी १ गुन्हा नोंद केला आहे. यामधील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने किंवा त्यांचे अन्वेषण प्रलंबित असल्याने याविषयी अधिक माहिती देता येणार नाही. यामुळे अन्वेषणात किंवा खटल्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.’’