राष्ट्र-धर्मप्रेमी समितीचे अधिवक्ता अनिश परळकर यांची चेतावणी
हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा !
मुंबई – ‘सोनी मराठी’ या मनोरंजन वाहिनीवरून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही विनोदी मालिका सादर करण्यात येते. त्यात हिंदु देवता, संत यांच्या वेशातील विनोदी पात्रे दाखवून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची मोठ्या प्रमाणात टिंगलटवाळी केली जाते. याविषयी राष्ट्र-धर्मप्रेमी समितीचे अधिवक्ता श्री. अनिश परळकर यांनी ‘सोनी मराठी’ वाहिनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. अमित फाळके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ‘असे प्रसंग घडतात किंवा असे आम्ही काही करतो’, हे नाकारून भेट घेण्यास नकार दिला. त्यानंतर अधिवक्ता अनिश परळकर, सर्वश्री विलास निकम, निनाद ओक आणि राऊळ हे हिंदुत्वनिष्ठ ‘सोनी मराठी’च्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले. सुरक्षारक्षकांनी कार्यालय बंद असल्याचे सांगितले. वास्तविक त्यांचे कर्मचारी आत-बाहेर करतांना निदर्शनास आले होते.
‘या विषयाच्या संदर्भात सोनी टीव्हीने हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू’, अशी चेतावणी अधिवक्ता अनिश परळकर यांनी दिली.