मागील ५ वर्षांत बंदीवानांनी पलायन करण्याच्या १६ घटना; मात्र १० जणांनाच पुन्हा कह्यात घेण्यात यश

पणजी, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यात मागील ५ वर्षांत पोलीस कोठडी, पोलीस संरक्षण आणि कोलवाळ मध्यवर्ती कारागृह यांमधून बंदीवानांनी (कैद्यांनी) पलायन करण्याच्या एकूण १६ घटनांची नोंद झालेली आहे; मात्र यातील १० जणांनाच पुन्हा कह्यात घेण्यात आले आणि ६ जण अजूनही सापडलेले नाहीत. या प्रकरणी पोलीस आणि कारागृह रक्षक मिळून एकूण २५ जणांच्या विरोधात कारवाई झाली आहे. यातील २४ जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले, तर एकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काहींना खात्यांतर्गत अन्वेषण करून पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. ही
माहिती नुकत्यात झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत गृह खात्याच्या वतीने एका अतारांकित प्रश्नावरील उत्तरात देण्यात आली.

गृह खात्याने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार राज्यात वर्ष २०२० मध्ये बंदीवानांच्या पलायनाची ५ प्रकरणे घडली आहेत. यामधील ३ प्रकरणांमध्ये ३ पोलीस, तर एका प्रकरणामध्ये ३ कारागृह कर्मचारी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यामधील एका प्रकरणात नायजेरियाचा नागरिक स्थानबद्धता केंद्रातून पळाला होता; मात्र अजूनही तो सापडलेला नाही. पलायन केलेल्या इतर बंदीवानांना पुन्हा पकडण्यात आले आहे. वर्ष २०२१ मध्ये एकच प्रकरण घडले असून यामध्ये ४ पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले. कैदी सहाबुद्दीन शेख याला पुन्हा कह्यात घेण्यात आले. कारागृहातून कैद्यांनी पलायन करण्याच्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलाने आता नवीन नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे बंदीवानाला पोलीस संरक्षण दिले जात असतांना किंवा बंदीवान कारागृहात असतांना प्रत्येकाचे दायित्व निश्चित केले जाणार आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून ३ वर्षांत ३१७ भ्रमणभाष संच जप्त

राज्यात कोलवाळ मध्यवर्ती कारागृह हे एकमेव कारागृह आहे. या कारागृहाची क्षमता ६२४ आहे, तर या ठिकाणी सध्या ६१६ बंदीवान आहेत. यामध्ये शिक्षा झालेले आणि सुनावणी चालू असलेले, अशा बंदीवानांचा समावेश आहे. या कारागृहात ‘जॅमर’ (भ्रमणभाषला इंटरनेट मिळणे बंद करणारी यंत्रणा) बसवण्यात आलेला नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष संचांची तस्करी होत आहे. कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घातलेल्या धाडीच्या वेळी गेल्या ३ वर्षांत या कारागृहातून ३१७ भ्रमणभाष संच कह्यात घेण्यात आले आहेत.