महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला. मंत्रीमंडळ स्थापन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार चालू झाला. पुणे जिल्ह्यातील ‘महाविकास आघाडी’च्या पराभूत ११ उमेदवारांनी ‘इ.व्ही.एम्.’ (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) यंत्रणेवर जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी अर्ज केले. त्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे ८ आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या ३ उमेदवारांचा समावेश होता. त्यातील बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी प्रथम त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर अनेकांनी त्यांचे तक्रार अर्ज मागे घेतले. आता केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सचिन दोडके यांची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे.
नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, ठाकरे गट यांनी जी ‘इ.व्ही.एम्.’विषयी भूमिका मांडली होती, त्याच भूमिकेची राज ठाकरे यांनी ‘री’ ओढली. निवडणुकीची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी अनेक वेळा उघडपणे आवाहन केले आहे की, ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र ‘हॅक’ करून दाखवा.’ तेव्हा मात्र देशातील कोणताही राजकीय पक्ष वा संघटना पुढे आली नाही. खरेतर कोणत्याही राजकीय पक्षाने स्वतःच्या पराभवाचे खापर ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रावर फोडणे, हे अनाकलनीय आहे. कार्यकर्ते, नेते किंवा एखाद्या व्यक्ती किंवा नेता यांवर या अपयशाचे खापर फोडता येत नाही. आपले नियोजन चुकले, अंदाज चुकले, प्रचार-प्रसार करण्यात अल्प पडलो, हे कुणीही प्रमुख नेता किंवा राजकीय पक्ष स्वीकारत नाही; परंतु अपयशाचे खापर कुणावर तरी फोडले पाहिजे, त्यातून हे खापर ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रावर फोडण्यात येते आणि तेही केवळ प्रसारमाध्यमांपुढे ! आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना नैराश्य येऊ नये, संभ्रमता निर्माण होऊ नये, त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये यांसाठी हा सगळा खटाटोप चाललेला दिसून येतो.
जेव्हा आपण निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त करतो, तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे, याचे भान नसते. राजकीय पक्षांनी बांधलेले आराखडे, अंदाज आणि अटकळ चुकल्याने निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता संपत नाही. केवळ तंत्रज्ञानावर अविश्वास दाखवून समाजात संभ्रम निर्माण होऊन हाती काहीच लागत नाही.
– श्री. अमोल चोथे, पुणे