गोव्यात बहुतांश देवस्थान समित्यांची बिनविरोध निवड

जांबावली, मये, आगरवाडा, वेळूस यांसह काही ठिकाणी वाद

पणजी, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील विविध देवस्थान समित्यांच्या निवडणुका ९ फेब्रुवारी या दिवशी झाल्या. ‘या निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, या दृष्टीने सज्ज रहावे’, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी देवस्थानच्या प्रशासकांना दिले होते. अनेक देवस्थान समित्यांची निवड बिनविरोध आणि उत्साहात झाली, तर जांबावली, मये, आगरवाडा, वेळूस यांसह काही ठिकाणी वाद निर्माण झाला. काही ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात आला.

निवडून आलेल्या काही महत्त्वाच्या देवस्थानच्या समित्या पुढीलप्रमाणे

पणजी येथील श्री महालक्ष्मी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी उद्योगपती श्रीनिवास धेंपे, सचिवपदी महेश कांदोळकर, खजिनदारपदी गौरीश धोंड आणि मुखत्यारपदी नारायण मांद्रेकर यांची निवड झाली. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवस्थानच्या अध्यक्षपदी दीनानाथ शांबा गावकर यांची बिनविरोध निवड झाली. मुळगाव, डिचोली येथील श्री सातेरी केळबाय देवस्थान समिती; नार्वे येथील श्री सप्तकोटेश्‍वर मंदिराची व्यवस्थापकीय समिती; पाचावाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानची कार्यकारी समिती आदी अनेक देवस्थान समित्यांची निवड बिनविरोध झाली. बार्देश तालुक्यात सर्व देवस्थान समित्यांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या आणि बहुतांश ठिकाणी कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली.

मये येथील श्री महामाया देवस्थानच्या निवडणुकीला स्थगिती

मये येथील श्री महामाया देवस्थानच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. कारबोटकर गटाने हरकत घेत ही निवडणूक प्रक्रिया अनधिकृत असल्याचा दावा केला होता. वेळूस, सत्तरी येथील श्री रवळनाथ देवस्थानच्या निवडणुकीवर गुरव समाजाने बहिष्कार घातला. साळ येथील श्री महादेव भूमिका देवस्थानच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला. साळ येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर देवस्थानच्या निवडणुकीला महाजनांचा प्रचंड प्रतिसाद

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर देवस्थानच्या निवडणुकीला महाजनांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मतदानासाठी महाजनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रारंभीच्या वादानंतर आगरवाडा, पेडणे येथे श्री नागनाथ भूमिका वेताळ देवस्थानची निवडणूक बिनविरोध

आगरवाडा, पेडणे येथे श्री नागनाथ भूमिका वेताळ देवस्थानच्या निवडणुकीत प्रारंभी २ गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. या वेळी जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर एका गटाने निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतली. यानंतर अव्वल कारकून गोपीनाथ मसुरकर यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर निवडणूक बिनविरोध झाली.

जांबावली येथील श्री दामोदर देवस्थान समितीची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात

जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानच्या विद्यमान समितीने काही महाजनांची नावे मतदारसूचीतून वगळली आहेत, तर काहींची नावे नव्याने समाविष्ट केली आहेत. ज्या महाजनांची नावे मतदारसूचीतून वगळण्यात आली आहेत, त्यांनी या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे आणि या याचिकेवर सध्या सुनावणी चालू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ७ फेब्रुवारी या दिवशी अंतरिम निर्देश देतांना देवस्थान समितीची निवडणूक घेण्यास संमती दिली होती. यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार या ठिकाणी निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रिया तणावपूर्ण वातावरणात झाली. ‘विद्यमान देवस्थान समितीने ज्यांची नावे मतदारसूचीतून वगळली आहेत, ते देवस्थान समितीने ज्या मतदारांची नावे नव्याने मतदारसूचीत समाविष्ट केली आहेत ते आणि मतदारसूचीतील नियमित मतदार या सर्वांनी मतदान करावे; परंतु प्रत्येक गटाची मतदान पेटी निराळी ठेवावी. मतदानानंतर ३ निरनिराळ्या मतदानपेट्यांना सर्व उमेदवारांच्या समोर मामलेदाराने टाळे ठोकावे आणि न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत त्या स्वत:च्या नियंत्रणात ठेवाव्या’, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. यामुळे निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या निर्देशानंतर दिला जाणार आहे.

साखळी येथील श्री पांडुरंग देवस्थानच्या अध्यक्षपदी प्रतापसिंह राणे, तर कार्यकारी अध्यक्षपदी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे
सांखळी येथील श्री पांडुरंग देवस्थानच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची निवड झाली, तर समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची निवड झाली. समितीच्या इतर पदांसाठी या वेळी निवड करण्यात आली