आज ‘विश्वकर्मा जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

वेद, पुराणे, उपनिषदे आणि अन्य संस्कृत ग्रंथ यांचा धांडोळा घेतला असता ‘भगवान विश्वकर्मा हा केवळ देवतांचा कारागीर नसून तोच सृष्टीनिर्मितीची बीजे आणि जड चेतन सृष्टी निर्माण करणारा विश्वनिर्माता आहे’, अशीच माहिती मिळते. ‘पौरुषेय प्रवर विधी’, या संस्कृत वाङ्मयातील एका श्लोकानुसार ‘जेव्हा भूमी, पाणी, प्रकाश, आकाश, वायू, तारका, ब्रह्मा, विष्णु काहीही नव्हते, सर्व शून्य असतांना केवळ एक आणि एकच विश्वकर्मा अस्तित्वात होता.’
‘शिवपुराणा’तील उल्लेखानुसार भगवान शंकराने पार्वतीला सांगितले की, हाच परमात्मा आदि भगवान विश्वकर्मा, सृष्टीचा निर्माता तोच आहे. त्यानेच प्रारंभीला सृष्टी निर्माण करण्यासाठी जे जे उत्पन्न करावेसे वाटत होते, ते ते निर्माण करून ठेवले. भगवान विश्वकर्माच्या ५ मुखांपासूनच १४ भुवने, पंचमहाभूते, पंच तन्मात्रा पंचदेय आणि पंचपुत्र निर्माण झाले. विश्वकर्माच्या पूर्व मुखाचे नाव ‘सद्योजात’, उत्तरेकडील मुख ‘ईशान’ नावाने ओळखले जाते, तर उर्ध्वमुखाला ‘तत्पुरुष’ हे नाव आहे. विश्वकर्माच्या स्वरूपाविषयी ‘स्कंद पुराणा’त एक श्लोक आहे. भगवान विश्वकर्माच्या विविध अवतारांचे उल्लेख श्रीमद्भागवत महापुराण, वायुपुराण, ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण, हरिवंश पुराण, स्कंद पुराण, महाभारत आदी ग्रंथांत आहेत. वेगवेगळ्या राज्यात त्या त्या अवतारांचे जन्मदिन साजरे होतात. कामगार संघटनाही वेगळ्या दिवशी ‘विश्वकर्मा जयंती’ साजरी करतात. महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर भारत येथील काही राज्यांतील पांचाल समाज माघ जयंती साजरी करतात.
(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, गोवा; ५.२.२०२५)