‘विमला गोयंका महाविद्यालया’च्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
कोल्हापूर – येथील ‘विमला गोयंका महाविद्यालया’ने ‘आय.टी.’, ‘कॉम्प्युटर सायन्स’ आणि ‘क्रॉप सायन्स’ या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे प्रवेश आवेदन भरून घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर या विषयांचे हॉलतिकिट (प्रवेश पत्र) मिळालेले नाही. असे असले, तरी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य मंडळाशी केलेल्या संपर्कानंतर मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहित दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे.
यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याविषयी संबंधित महाविद्यालयास सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित महाविद्यालयामधील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित रहाणार नाही, याची दक्षता मंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे विज्ञान शाखेचे एकूण १४९ विद्यार्थी असून त्यापैकी ७० विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयाने ‘ऑनलाईन’ भरलेले नव्हते, तसेच प्रवेश आवेदन भरलेल्या २६ विद्यार्थ्यांना विषयात दुरुस्ती हवी आहे. वास्तविक या दुरुस्ती महाविद्यालयाने करणे अपेक्षित असतांना त्यांनी त्या न केल्याने या महाविद्यालयाने भरलेल्या प्रवेश आवेदनानुसारच मंडळाने प्रवेश पत्र दिले. यात शिक्षण मंडळाकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कळवले आहे.