‘ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या ३ मासांच्या कालावधीत मला पू. दीपालीताईसह गोवा येथील रामनाथी आश्रमाच्या एका खोलीत रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. वागण्यात सहजता असल्याने अन्य साधिकांना दडपण न वाटणे : पू. दीपालीताईला ‘मी संत आहे’; म्हणून कोणीतरी माझे कपडे धुवायला पाहिजेत’, ‘माझे कपडे इस्त्री करून द्यायला पाहिजेत’, असे कधीच वाटले नाही. ती स्वतःच सगळी कामे करायची. पू. ताईचे वागणे अगदी सहज असायचे. त्यामुळे ‘संतांसह खोलीत रहात आहोत’, याचे आम्हाला कधीच दडपण वाटले नाही.
१ आ. प्रेमभाव
१. मी एकदा तापाने रुग्णाईत असतांना सकाळची न्याहारी आणि चहा तीच मला खोलीत आणून द्यायची. तेव्हा तिलाही सर्दी, ताप होता; पण ती म्हणायची, ‘‘माझ्यापेक्षा तुला जास्त बरे नाही; म्हणून मी तुला न्याहारी आणून देते.’’
२. माझा दिवाळीत वाढदिवस असल्याचे तिला आदल्या दिवशीच कळूनही वाढदिवसाच्या दिवशी तिने मला एक भेटवस्तू दिली. तेव्हा मला ‘तिच्या प्रत्येक कृतीतून इतरांना ती कशी आनंद देते’, हे शिकायला मिळाले.
३. एका साधिकेचा वेळ भ्रमणभाष पहाण्यात वाया जात असल्याने तिचा साधनेतील अमूल्य वेळ वाया जात असल्याची पू. ताईलाच खंत वाटायची. त्यासंदर्भात पू. ताईने त्या साधिकेचे मन न दुखावता तिच्याशी प्रेमाने संवाद साधला.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती असलेला भाव

१ इ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून पूर्वी शिकायला मिळालेली सूत्रे सांगणे : पू. दीपालीताई यांना पूर्वी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पू. ताईच्या अजूनही स्मरणात आहेत. ते प्रसंग ती आम्हाला भावपूर्णरित्या सांगायची. त्यामुळे आम्हालाही भावावस्थेत रहाता येत होते.
१ इ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती असलेल्या भावामुळे व्यष्टी प्रकृतीतून समष्टी प्रकृतीत रूपांतर होणे : अनेक वर्षांपूर्वी जेव्हा पू. दीपालीताई रामनाथी आश्रमात रहायला होती, तेव्हा तिची व्यष्टी प्रकृती होती. केवळ ‘ती आणि श्रीकृष्ण’ एवढेच तिचे विश्व होते; पण जशी ती अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमातून बाहेर गेली, तसे तिच्यात पुष्कळ व्यापकत्व आले आणि तिची निर्णयक्षमता वाढली. ती खोलीत बसून साधकांचे भ्रमणभाषवरून सत्संग घेत असतांना ती सांगत असलेली सूत्रे ऐकून ‘ती व्यष्टी प्रकृतीतून समष्टी प्रकृतीत कशी गेली ? यासाठी तिने कसे प्रयत्न केले ?’, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. यासंदर्भात एकदा मी तिला विचारले. तेव्हा तिने मला ‘ती चुकांतून कशी शिकत गेली ? साधकांमध्ये श्रीकृष्णाचे रूप पाहून त्या रूपाशी एकरूप होण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आपल्यावर एवढा विश्वास टाकला आहे, तर प्रयत्न करत रहायचे’, असा विचार करते. तेव्हा मला वाटले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दाखवलेल्या विश्वासास ती पात्र ठरली.’
१ ई. खोलीतील प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्याची सेवा स्वतःहून मागून घेणे आणि रुग्णाईत असतांनाही त्या सेवेत सातत्य राखणे : ‘पू. ताई खाेलीत रहायला आल्यावर पहिले १० – १२ दिवस मी तिला खोलीतील कोणतीच स्वच्छतेची सेवा करायला सांगितली नाही; पण नंतर तिने स्वतःहून खोलीतील शौचालय आणि स्नानगृह यांची स्वच्छता करायला आरंभ केला. तेव्हा मी तिला तसे न करण्याविषयी सांगितले; पण ती म्हणाली, ‘‘मी नुसती बसूनच सेवा करत असते. मीपण शौचालय आणि स्नानगृह यांचा वापर करतेच ना ? मग मी त्यांची स्वच्छता केली; म्हणून काय झाले ?’’
तेव्हा ‘तिला त्या सेवा करायला लागतात’, याचा मला संकोच वाटायचा; पण ती प्रतिदिन न चुकता स्वच्छता करायची. मध्यंतरी ती पोटदुखीने रुग्णाईत असल्याने तिला रुग्णालयात भरती केले होते. रुग्णालयातून आल्यावरही दुसर्या दिवशीपासून तिने पुन्हा स्वच्छता करायला आरंभ केला. तेव्हा मी तिला ‘‘तुला बरे नसल्याने तू करू नको’’, असे सांगितले, तरी ती म्हणायची, ‘‘अगं, आता मी खरंच बरी आहे.’’ रुग्णाईत असूनही तिने स्वच्छता करण्यात कधीच सवलत घेतली नाही.
२. अनुभूती – खोलीतील स्पंदने पालटणे
अ. मला एरवी सूक्ष्मातील स्पंदने कधी ओळखता येत नाहीत; पण पू. दीपालीताई खोलीत रहायला आलेल्या दिवसापासून खोलीतील स्पंदने लगेच पालटल्याचे लक्षात आले. खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवू लागले. ‘पू. ताईच्या आगमनाने खोलीलाही आनंद झाला आहे’, असे वाटले.
आ. मासातून (महिन्यातून) एकदा करायच्या खोलीच्या सामूहिक स्वच्छतेच्या वेळीही पू. ताईने आम्हाला पुष्कळ साहाय्य केले. स्वच्छता चालू करण्यापूर्वी तिने स्वतः आम्हाला प्रार्थना सांगून आमच्याकडून स्वच्छता करवून घेतली. खरेतर पू. ताई ‘संत’, खोलीतील अन्य एक साधिका ‘वयस्कर’ आणि मी ‘आध्यात्मिक त्रास असणारी’ अशा ३ गटांतील साधिका होतो; पण पू. ताईने पुढाकार घेऊन खोली स्वच्छता केल्याने पूर्वीपेक्षा खोलीत अधिक उजेड आल्याचे आम्हाला जाणवू लागले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, पू. दीपालीताईचे गुण माझ्यातही येऊ दे, तिच्यासारखे व्यष्टीतून समष्टी प्रकृतीत जाण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२५)
|