पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – माघ शुक्ल जया एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा पार पडली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ; तर रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. माघ एकादशीनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच परराज्यांतून ४ लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल-रक्मिणीचे दर्शन घेतले. माघ एकादशीनिमित्त मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली होती.
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंिदर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून समितीच्या वतीने दर्शनरांगेत आणि दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. पहाटेपासून चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो वारकरी दिंड्यासह प्रदक्षिणा मार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पददर्शन आणि मुखदर्शन घेतले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट !

एकादशीनिमित्त मुख्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अष्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, हिरवा पाला, सूर्यफूल, कलकत्ता शेवंती जिप्सी, कामिनी इत्यादी दीड टन फुलांचा वापर करण्यात आला होता. सदरची सजावट पुणे येथील भाविक सर्वश्री सचिन आण्णा चव्हाण, संदीप विठ्ठल पोकळे आणि युवराज विठ्ठल सोनार यांनी सेवाभाव म्हणून करून दिली होती.