मंदिरांचे पावित्र्यता, धर्म-परंपरांचे जतन करण्याचा भाविकांचा निर्धार !

कोल्हापूर, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या तृतीय परिषदेत ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय घेण्यात असून त्यानुसार शुक्रवार, ७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात रात्री ८ वाजून १० मिनिटांनी आरती करण्यात आली. ही आरती ‘वडार समाज संघटने’चे शहराध्यक्ष श्री. संजय शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आली. श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात ज्या वेळेत आरती होते, त्याच वेळेत ही आरती करण्यात आली.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, सर्वश्री महेश पवार, संदीप माळी, सागर पाटील यांसह विविध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर संपूर्ण मंदिर परिसरात ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी ‘हिंदु राष्ट्र हवेच’, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित भाविकांनी आरतीत सहभागी होत हिंदु एकतेचा संदेश दिला. या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघ, कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील यांनी, ‘हिंदु समाजाच्या सर्व स्तरांवरील लोकांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्यात पुढाकार घ्यावा’, असे आवाहन केले.