कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री साई मंदिरात भावभक्तीने सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शरद शांताराम वारेकर (वय ७३ वर्षे) !

श्री. शरद शांताराम वारेकर हे कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथे वर्ष १९९८ मध्ये श्री साई मंदिराची निर्मिती झाल्यापासून तेथे सेवा करतात. त्यांच्या परिचयातील सनातन संस्थेच्या साधकांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. शरद वारेकर

१. श्री. भार्गव गंगाधर वझे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६९ वर्षे), कोतवडे (जि. रत्नागिरी)

श्री. भार्गव वझे

१ अ. भावभक्तीने २६ वर्षे श्री साई मंदिरात सेवा करणे : ‘गेल्या २६ वर्षांपासून श्री. शरद वारेकर श्री साई मंदिरात अधिकाधिक सेवा करतात. अनेक लोकांना माहिती सांगतात आणि त्यानुसार आजपर्यंत अनेक भक्तांनी त्या साई मंदिरात विशेष सेवा केली आहे.

१ आ. प्रतिदिन ग्रामदेवतेची सेवा करणे : प्रतिदिन साई मंदिरात पूजा झाली की, सकाळीच ते तेथून काही अंतरावर असलेल्या कोतवडे गावाची ग्रामदेवता स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवी हिच्या मंदिरात जातात. देवीची पूजा करणार्‍या गुरवांना देवीवर अभिषेक करण्यासाठी ते प्रतिदिन दूध आणि उष्णोदक (गरम पाणी) मंदिरात आणून देतात. मंदिरात आल्यावर त्यांना प्रसन्न वाटते. ‘देवी हसते, बोलते’, असे त्यांना वाटते.

१ इ. श्री साईबाबा आणि श्री महालक्ष्मीदेवी यांच्याप्रतीचा भाव

१. ते श्री साईबाबांना कोणताही पदार्थ स्वतःच्या हाताने भरवतात. ‘प्रत्येक कृती बाबा करून घेतात, आई महालक्ष्मी करून घेते’, असा त्यांचा भाव असतो. त्यांना सगळीकडे बाबांचा सहवास जाणवतो.

२. त्यांना काही दुखणं आल्यास ते तिथे साईबाबांचे तीर्थ आणि उदी (अंगारा) लावतात. त्यामुळे त्यांना बरे वाटते.

१ ई. श्री. वारेकर यांनी संतांच्या आज्ञेप्रमाणे श्री साईबाबांचे तीर्थ विहिरीत घातल्यानंतर विहिरीतील मचूळ पाणी पिण्यायोग्य होणे : मुंबई येथील संत प.पू. आनंदस्वामी यांनी सांगितल्यानुसार श्री. वारेकर यांनी कोतवडे येथील श्री साई मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला स्नान घातल्यावर ते तीर्थ आरंभी १५ दिवस प्रतिदिन त्या देवालयाजवळ असलेल्या विहिरीत घालायला सांगितले. पूर्वी त्या विहिरीचे पाणी मचूळ (खारटसर) असल्याने ते पाणी कुणी पीत नव्हते. साईबाबांचे तीर्थ प्रतिदिन त्यांनी विहिरीत भावपूर्ण घातल्याने आता त्या विहिरीचे पाणी स्वच्छ आणि गोड झाले आहे. आता त्या विहिरीचे पाणी सर्व जण पिण्यासाठी वापरतात.

१ उ. इतरांना अडचणीच्या वेळी आधार देणे : गेले वर्षभर कोतवडे येथील एक पुरोहित श्री. योगेश सहस्रबुद्धे साई मंदिरात प्रतिदिन पूजेसाठी जातात. त्यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी श्री. वारेकर यांनी स्वतः तिथे जाऊन त्यांना अंगारा आणि तीर्थ देऊन ‘साईबाबा सगळे व्यवस्थित करतील’, असे आश्वस्त केले. त्यांनी त्यांच्यासाठी स्वतः साईबाबांना प्रार्थना केली आणि नामस्मरण केले.

१ ऊ. स्वतःच्या परीने दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रचार करणे

१. ते वर्ष २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक आहेत. त्यांना दैनिक पुष्कळ आवडते. ते प्रतिदिन ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ वाचतात. ‘सनातन प्रभात’ वाचून झाल्यावर ते स्वतः त्याविषयी इतरांना माहिती सांगून इतरांनाही ‘सनातन प्रभात’ वाचायला देतात. विशेष काही लेख असल्यास त्याच्या छायांकित प्रती काढून ते लोकांना देतात.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचू लागल्यापासून ते ‘पूर्वी अन्य संत हिंदु धर्मासाठी कुणी एवढे काही करत नव्हते; पण डॉ. आठवले अनेक वर्षांपासून हिंदु धर्मासाठी भारतात बरेच कार्य करत आहेत’, असे म्हणतात.

३. त्यांचे बंधू मुंबईला असतात. ते घरी आले असता श्री. वारेकरांनी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक दिला.

४. त्यांनी त्यांच्या मुलाला दैनिक ‘सनातन प्रभात’ला विज्ञापन देण्यास सांगितले. तेव्हा तो लगेच तयार झाला.

१ ए. रामनाथी आश्रमातून मिळालेल्या प्रसादाविषयी भाव : रामनाथी आश्रमातून गुरुदेव आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. वारेकर यांच्यासाठी प्रसाद पाठवला होता. तेव्हा त्यांनी ‘साईबाबांना आश्रमातील प्रसाद भरवल्यानंतर आपण खाऊ’, या भावाने तो प्रथम साईबाबांना प्रत्यक्ष भावपूर्ण भरवला.

श्री. गिरिधर वझे

२. श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

अ. ‘श्री. शरद वारेकर यांना कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री साई मंदिरात प्रत्यक्ष साईबाबांविषयी विविध अनुभूती आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून श्री साई मंदिरात गेल्यावर अनेकांना चांगले वाटते आणि अनुभूती येतात.

आ. ते अर्पण, तसेच काही भेटवस्तू रामनाथी आश्रमात देत असतात.

इ. त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातनचे सर्व साधक यांच्याप्रतीही चांगला भाव आहे. ते कोतवडे येथील श्री साई मंदिराचे मुख्य असले, तरी ते नेहमी शिष्य (सेवक) भावात असतात.’

(सर्व सूत्रांचा मास आणि वर्ष : नोव्हेंबर २०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक