कु. प्रतीक्षा हडकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती !

१. मुंबई सेवाकेंद्रात स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी मिळणे आणि ‘दर्शनाची हीच संधी’ हे भजन मनातल्या मनात म्हणत कृतज्ञता व्यक्त होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २००४ मध्ये मला मुंबई सेवाकेंद्रात स्वयंपाकघरात सेवा करण्यास संधी मिळाली. त्या वेळी मला स्थुलातून पू. आई (पू. (कै.) नलिनी बाळाजी आठवले, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आई) आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी) यांना जवळून पहाता आले. त्या वेळी माझ्याकडून प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘दर्शनाची हीच संधी’ हे भजन मनातल्या मनात सतत म्हटले जायचे आणि मी कृतज्ञता व्यक्त करायचे. (तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले गोवा येथे रहात असत.)

२. वर्ष २००५ मधील प्रसंग

कु. प्रतीक्षा हडकर

२ अ. सेवाकेंद्रातील साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या भावाच्या मुलीच्या लग्नाला जाण्याची संधी लाभणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या धाकट्या भावाच्या मुलीचे (दिवंगत डॉ. सुहास आठवले यांच्या मुलीचे) लग्न होते. परात्पर गुरु डॉक्टर देवद आश्रमातून परस्पर लग्नस्थळी येणार होते. त्या वेळी आम्ही सेवाकेंद्रात ७ ते ८ साधक होतो. एका साधिकेने (कु. धनश्री भंडारी, बोरीवली, मुंबई) दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व स्वयंपाक सिद्ध करून ठेवला होता; कारण दुपारी सेवेला आलेले प्रसारातील साधकही सेवाकेंद्रात जेवायला असायचे.

२ आ. साधिकेसह अन्य ४ साधकांना सेवाकेंद्रातच थांबायला सांगितल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाची संधी हुकणार’, या विचाराने साधिकेला रडू येणे आणि तिने स्नानगृहात जाऊन रडतच परात्पर गुरु डॉक्टरांना आळवणे : सकाळी एका गाडीत काही साधक पू. आईंना घेऊन लग्नस्थळी गेले होते. नंतर दुपारी अजून एका गाडीतून साधक जायला निघत होते. त्यांनी आम्हा ५ साधकांना सांगितले, ‘‘तुम्ही सेवाकेंद्रातच थांबा; कारण प्रसारातील साधकही येतील. ते महाप्रसादाला असतील. त्यांना अडचण यायला नको; म्हणून आपण सेवाकेंद्र बंद करून जाऊ शकत नाही.’’ त्यानुसार आम्ही ५ जण थांबलो. ‘सेवाकेंद्रात थांबायला लागणार’, हे ऐकताच मला निराशा आली. मी स्नानगृहात अंघोळीला गेले आणि पुष्कळ रडले. ‘परम पूज्य, मी तुम्हाला कधी पाहिले नाही. आज तुमचे दर्शन होणार होते. तीसुद्धा संधी गेली. ‘देवा, मी कुठे न्यून पडते ?, हे मला कळत नाही. मला तुम्हाला पहायचे आहे. तुम्हाला भेटायचे आहे. माझा जीव कंठाशी आला आहे’, असे मी मनातून परात्पर गुरु डॉक्टरांना सांगत होते.

२ इ. लग्नस्थळी परात्पर गुरु डॉक्टरांनी सेवाकेंद्रातील साधकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करणे आणि साधकांना बोलावून घेणे : तिकडे लग्नस्थळी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘सेवाकेंद्रातील साधक आले का ? मला त्यांना भेटायचे आहे’’, असे सांगितले. साधक म्हणाले, ‘‘आम्ही काही जण आलो आहोत. शेष ५ जणांना सेवाकेंद्रातच ठेवले आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘मग त्यांना बोलवा.’’

२ ई. साधिकेला लग्नस्थळी येण्याचा निरोप मिळाल्यावर ‘मला देव भेटणार आहे’, या विचाराने पुष्कळ आनंद होऊन तिने कृतज्ञता व्यक्त करणे : नंतर मी अंघोळ करून बाहेर आले. काही क्षणांतच मला लग्नस्थळी येण्याचा निरोप मिळाला. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि मी कृतज्ञता व्यक्त केली. ‘देवाने मला बोलावले आहे आणि मला देव भेटणार आहे’, याचा मला पुष्कळ आनंद झाला होता; परंतु  कु. धनश्रीला ठेवून जायचे, हे ऐकल्यावर मला थोडे वाईट वाटले; परंतु दुसरा पर्याय नव्हता. माझ्या मनात लग्नस्थळी जाईपर्यंत अधूनमधून तिचा विचार येत होता. (धनश्री ही १ वर्ष सुखसागर येथे होती. तिची परम पूज्यांशी भेट झाली होती. त्यामुळे तिला सेवाकेंद्रात थांबायला सांगितले.)

२ उ. लग्नस्थळी प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. जोशीबाबा यांच्या दर्शनाचा लाभ होणे अन् साधिका प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून भेटणे : तिकडे गेल्यावर आम्ही प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. जोशीबाबा (घाटकोपर, मुंबई येथील संत) यांचे दर्शन घेतले. नंतर आम्ही साधक आसंद्या गोलाकार मांडून बसलो. नंतर परात्पर गुरु डॉक्टर येऊन बसले. परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना म्हणाले, ‘‘साधनेसंदर्भात काही प्रश्न असतील, तर विचारा.’’ साधक काहीच बोलले नाहीत.  तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘कुणालाच काहीच प्रश्न नाही, तर मग थांबूया. ’’ त्यानंतर काही साधक बोलले.

२ ऊ. प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांना जवळून भेटणे आणि त्यांना मान वर करून पाहू न शकणे : मी पहिल्यांदाच परात्पर गुरु डॉक्टरांना जवळून भेटत होते. मी त्यांच्या समोर बसले होते; पण मी मान वर करून त्यांना पाहू शकत नव्हते. शेवटी शेवटी मी त्यांना पाहिले; परंतु ‘त्यांच्याशी नेमके काय बोलायचे ?’ असा मला प्रश्न पडला.

२ ए. परात्पर गुरु डॉक्टरांनी अत्यंत प्रेमाने साधिकेच्या घरच्यांची विचारपूस करणे आणि तिच्या सेवेविषयी आत्मीयतेने चौकशी करणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वत:हून माझ्या घरच्यांची विचारपूस केली. ‘‘मी काय सेवा करते ?’’ ते विचारले. कु. धनश्रीची त्यांनी आठवण काढली आणि म्हणाले, ‘‘तिच्यासाठी इथून जेवण भरून डबा घेऊन जा.’ आम्ही १५ ते २० मिनिटे बोललो. नंतर आम्ही निघालो.

२ ऐ. लग्नाला आलेल्या काही जणांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या वात्सल्यमय दृष्टीवरून ‘ते साधिकेचे वडील असतील’, असे वाटणे : नंतर लग्नाला आलेले काही जण माझ्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही सर्व यांचे कोण आहात ?’’ मी म्हटले, ‘‘ते आमची गुरुमाऊली आहेत.’’ काही जण म्हणाले, ‘‘हो, किती प्रेमाने ते तुम्हाला पहात होते !’’ काही जणांनी मला विचारले, ‘‘हे तुझे वडील आहेत का ?’’ मी पटकन म्हणाले, ‘‘हो. हे माझे बाबा आहेत.’’ (मी असे बोलून गेले. नंतर ते माझ्या लक्षात आले.)

२ ओ. रात्री परात्पर गुरु डॉक्टरांनी दूरभाष करून ‘धनश्रीसाठी जेवणाचा डबा नेला का ?’ ते विचारणे आणि साधक डबा आणायला विसरल्याचे समजल्यावर त्यांनी स्वतःच डबा भरून पाठवणे : मी गाडीत बसले. मी साधकांना ‘‘धनश्रीताईसाठी डबा भरून घेतला कि घ्यायचा आहे ? ’’ असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘नाही. आपल्याला लवकर पोचायला हवे. मागच्या गाडीतून धनश्रीला डबा आणणार.’’ मी ‘‘बरे’’ म्हटले. आम्ही सेवाकेंद्रात पोचलो. नंतर दुसरी गाडी आली; परंतु साधकांनी धनश्रीसाठी जेवणाचा डबा आणला नाही. रात्री परात्पर गुरु डॉक्टरांनी दूरभाष करून विचारले, ‘‘धनश्रीला जेवण नेले का ? ’’ संबंधित साधक म्हणाला,‘‘नाही, विसरलो.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनीच धनश्रीसाठी जेवणाचा डबा भरून तो येणार्‍या गाडीतून पाठवला.

२ औ. शिकायला मिळालेली सूत्रे : परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःहून साधकांचा पाठपुरावा घेतला आणि नंतर त्यांनी स्वतःच कु. धनश्रीसाठी डबा पाठवला. या प्रसंगात मला परात्पर गुरु डॉक्टरांचे साधकांवरील प्रेम, इतरांचा विचार करणे आणि सेवेतील परिपूर्णता, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. त्यांनी साधकांकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून देऊन स्वतःच्या कृतीतून सर्वांना शिकवले.’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक