Prayagraj Kumbh Parva 2025 : कुठल्याही परिस्थितीत मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणारच ! – विश्‍व हिंदु परिषद

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • प्रयागराज येथे पार पडली विहिंपची तीन दिवसांची बैठक

  • रणनीती सिद्ध; व्यापक लढा उभारण्याचा निर्धार

विहिंपच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीला संबोधित करतांना संत आणि मान्वयर

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – कुठल्याही परिस्थितीत मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणारच, असा निर्धार विश्‍व हिंदु परिषदेने केला. विहिंपच्या केंद्रीय मंडळाची ३ दिवसांची (७ ते ९ फेब्रुवारी) राष्ट्रीय बैठक प्रयागराज येथे पार पडली. त्यात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. मंदिरमुक्तीसाठी देश-विदेशातील ९५० प्रतिनिधींनी एक मोठी रणनीती सिद्ध करण्यात आल्याचीही माहिती विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. आलोक कुमार यांनी या वेळी पत्रकार परिषदेत दिली.

मंदिरमुक्ती आंदोलनाच्या कृती कार्यक्रमाविषयी बोलतांना कुमार म्हणाले…,

डावीकडून विहिंपचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख श्री. विजय शंकर तिवारी आणि बोलतांना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. आलोक कुमार

१. मंदिरमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात विहिंपचे कार्यकर्ते इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ‘सरकारांनी हिंदूंची मंदिरे हिंदु समाजाकडे परत सोपवावीत’, अशी मागणी करतील. उत्तर आणि दक्षिण भारतात मोठ्या जनसभांच्या माध्यमातून या मागण्या करण्यात येतील.

२. आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक राज्याची राजधानी, तसेच महानगरे यांमध्ये बद्धीजीवी समाजाच्या बैठका आयोजित करून व्यापक जनसमर्थन मिळवले जाईल. ज्या राज्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे, तेथे आगामी विधानसभा अधिवेशनाच्या वेळी विहिंपचे कार्यकर्ते आमदारांची भेट घेऊन मंदिरमुक्तीविषयी राजकीय पक्षांवर दबाव आणतील.

३. मंदिरांना त्यांचा कारभार चालवण्यासाठी पूर्ण स्वायत्तता मिळावी, याविषयी आमचे एकमत आहे. मंदिरांच्या व्यवस्थापनावर कोणतेही बाह्य नियंत्रण आता स्वीकारले जाणार नाही. अर्थात् आमचे आंदोलन हे केवळ सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरांच्या संदर्भात आहे, इतर मंदिरांच्या संदर्भात नाही.

विहिंपच्या केंद्रीय मंडळाची प्रयागराज येथे पार पडलेली राष्ट्रीय बैठक

४. मंदिरांच्या निधीचा वापर केवळ हिंदु समाजाच्या कार्यासाठीच केला गेला पाहिजे. यासाठी पारदर्शक खाती आणि लेखापरीक्षणाची प्रक्रिया असणार आहे.

५. मंदिरांच्या व्यवस्थापनात संपूर्ण हिंदु समाजाच्या सहभागासह मंदिरांसाठी स्थापन होणार्‍या ट्रस्टमध्ये महिला आणि अनुसूचित समाजाच्या प्रतिनिधी यांना स्थान असणार आहे.

६. विहिंपच्या तीन दिवसीय बैठकीत पू. स्वामी श्री परमानंद महाराज, बौद्ध लामा पू. चोस फेल ज्योतपा जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबाळे, तसेच संघाचे माजी सरकार्यवाह आणि विहिंपचे पालक अधिकारी श्री. भैयाजी जोशी उपस्थित होते.