Veteran Singer Asha Bhosle : सभ्य भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यवान योगी आदित्यनाथ मला आवडतात ! – आशा भोसले, ज्येष्ठ गायिका

ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सभ्य असते. विरोधी पक्षाने जरी आरोप केले, तरी ते कधीही त्यांना वाईट बोलत नाहीत. पंतप्रधान मोदी पहाटे उठतात. ते योगासने करतात आणि कामाला लागतात. योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसते. त्यांच्याकडे धैर्य आहे. त्यामुळे मला राजकारणामध्ये योगी आणि मोदी आवडतात, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या आनंदोत्सव संगीत समारोहात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘एकनाथ तूू…लोकनाथ तू’ या गाण्याचे अनावरण आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी आशा भोसले यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत ऐकण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशा भोसले म्हणाल्या की,

१. बाळासाहेब ठाकरे हे माझे आवडते राजकारणी होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत माझी मैत्री होते. बाळासाहेबांनी शिवसेना घडवली. तशी एकनाथ शिंदे आता घडवत आहे. एकनाथ शिंदे हिमतीने पुढे आले आणि यशस्वी झाले. माझा त्यांना आशीर्वाद आहे. शिंदे चांगले कर्म करत आहेत. चांगले कर्म करणारे संपत नाहीत.

२. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही मला आवडतात. राज ठाकरे यांचे बोलणे चांगले आहे. देवेंद्र फडणवीस हेही माझे आवडते नेते आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी भेटले, यासाठी मी भाग्यवान असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

३. माईक हा माझ्यासाठी देव आहे. मी प्रत्येक गाणे हे पहिले गाणे असल्यासारखे गाते.

४. तंत्रज्ञान हे विष आणि अमृत यांच्याप्रमाणे आहे. तंत्रज्ञान हे विचार करण्याची क्षमता घालवणारे आहे. माझ्या आवाजात एआयच्या (कृत्रिम बुद्धीमत्तेच्या) माध्यमातून गाणी कराल; पण गाण्यामधील भावना कुठून आणणार ?

५. सध्याच्या पिढीविषयी त्या म्हणाल्या की, पूर्वीप्रमाणे आता माणुसकी राहिली नाही. आता सर्व विस्कटलेले दिसते.