कोल्हापूर – विशाळगडावर असलेली अतिक्रमणे ३० दिवसांत काढून घ्यावीत, अशी नोटीस पुरातत्व विभागाने गडावरील २३ अतिक्रमणकर्त्यांना दिली आहेत. ही अतिक्रमणे न काढल्यास सरकारी प्राधिकरणाकडून पुढील सूचना न देता बांधकाम पाडले जाईल आणि त्याचा व्यय (खर्च) अतिक्रमणकर्त्यांकडून वसूल केला जाईल, असेही पुरातत्व विभागाच्या वतीने कळवण्यात आलेले आहे.
गतवर्षी १४ जुलै २०२४ ला शिवभक्तांच्या झालेल्या उद्रेकानंतर प्रशासनाने ९४ अतिक्रमणे हटवली होती. यातील काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने ‘पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमण काढू नका’, असा आदेश दिला होता; मात्र पावसाळ्यानंतरही ही अतिक्रमणे काढण्याविषयी कोणतीच हालचाल होत नव्हती. या संदर्भात सांगली येथील माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन ही अतिक्रमणे काढण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते. त्यावर महसूलमंत्र्यांनी अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश दिले होते. (मुळात असा आदेश द्यावा लागू नये. प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे. यासाठीच त्यांना नोकरीवर ठेवले असून जनतेच्या करातून त्यांना वेतन दिले जात आहे. जर ते त्यांचे काम प्रामाणिकपणे करत नसतील, तर अशांना नोकरीतून काढून टाकणेच योग्य आहे ! – संपादक)