Traffic Jam At Mahakumbh : महाकुंभक्षेत्री भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढल्याने १५ किमी लांबीची वाहतूक कोंडी !

महाकुंभक्षेत्री वाहतूक कोंडी

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री ९ फेब्रुवारी या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे शहरातील विविध मार्गांवर १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लक्ष्मणपुरी, वाराणसी, कानपूर आणि रिवा येथून प्रयागराजला येणार्‍या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही स्थिती गेल्या ४ ते ५ दिवसांपासून आहे. वाहनांना महाकुंभक्षेत्री प्रवेश बंद केल्याने अनेक वाहनधारक रस्त्यातच वाहने लावून संगम तटावर चालत जाऊन स्नान करत आहेत.

१. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक वाहनधारक आणि भाविक अनेक घंट्यांपासून ताटकळत राहिले आहेत. वाहतुकीची कोंडी सोडवण्यात प्रशासनाचा कस लागत आहे.

२. भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयागराज रेल्वे स्थानकावर आपत्कालीन व्यवस्थापन योजना लागू करण्यात आली आहे.

३. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रयागराजहून मध्यप्रदेशाकडे जाणारी बस उलटली असून यात १२ हून अधिक घायाळ झाले आहेत. गर्दीचा भार पाहून प्रशासनाने वाहतूक मार्ग अन्य मार्गांना वळवले आहेत.

४. प्रयागराज येथे अधिक कालावधीसाठी न थांबता संगमस्नान झाल्यावर भाविकांनी त्वरित निघून जावे, अशी सूचना प्रशासन करत आहे.