नगर – श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टद्वारे अहिल्यानगरमध्ये प्रथमच जोधपूर (राजस्थान) येथील पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीने संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन ८ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये करण्यात आले आहे. या सोहळ्याची निमंत्रणपत्रिका ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला देऊन पत्रिका वाटपाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदलालजी मणियार यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातील श्री विशाल गणपति मंदिरात विधीवत् पूजा करून कथा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका श्री गणपतीला देण्यात आली. कथा सोहळ्याचे मुख्य यजमान श्री. रामनिवास इंदाणी, श्री. सतीशचंद्र इंदाणी यांच्या हस्ते यथासांग पूजा विधी झाला. वेदमूर्ती श्री. गणेश भालेराव यांनी पौरोहित्य केले.’’