हिंदु जनजागृती समितीची नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी !

दिग्रस (यवतमाळ) – सध्या बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात खालील घटना घडल्या आहेत. सिल्लोड (संभाजीनगर) उपविभागीय कार्यालयात जन्म प्रमाणपत्रांच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि घोटाळा उघडकीस आला आहे. त्यात १ लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांनी भारतीय नागरिकत्व, आधारकार्ड, आणि अन्य कागदपत्रे मिळवून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वास्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक थोड्या थोड्या कालावधीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवैधरित्या रहाणारे बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट असून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठवण्यात आले. या वेळी समितीचे श्री. विजय वर्मा, श्री. कुलदीप जोशी, श्री. आस्तिक गावंडे, श्री. गजानन मोरे उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या !
१. राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी शोधमोहीम / ‘कोबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे. सापडलेल्यांवर कठोर कारवाई करावी आणि देशाबाहेर हाकलून लावावे.
२. घुसखोरांना बनावट कागदपत्रे पुरवणार्यांचे ‘रॅकेट’ उघडकीस आणून त्यामध्ये सहभागी असणार्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, तसेच बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणारे, अर्थसाहाय्य करणारे, जामीन देणारे यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा. या सर्वांची बँक खाती गोठवावीत.
३. घुसखोर खोटी नावे धारण करून रहातात. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूंची चौकशी करून, कागदपत्रांची पडताळणी करूनच भाडेकरू म्हणून ठेवावे; तसेच कामावर ठेवतांनाही कागदपत्रांची पडताळणी करूनच कामावर ठेवावे. कुणी संशयास्पद वाटल्यास लगेचच पोलिसांना कळवावे, या संदर्भात आवश्यक त्या कठोर सूचना द्याव्यात.