आज (९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी) ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘समाजातील व्यक्ती आणि साधक यांच्याकडून अनेक वेळा सद्गुरु किंवा सत्पुरुष यांनी सांगितलेली साधना, सेवा, वाचन, लेखन इत्यादी गोष्टी केल्या जातात. काही वेळा समाजातील व्यक्ती या गुरु किंवा ईश्वर यांना अपेक्षित असे न करता स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावून, मनाने ठरवून आणि निष्कर्ष काढून साधना करतात. एवढेच नव्हे, तर काही जण जिज्ञासू अन् साधक यांची श्रद्धा डळमळीत करून त्यांना साधना करण्यापासून परावृत्त करतात. आपण परमार्थ करतांना आणि गुरुकृपा झाल्यावरही अनेक वेळा मनात काही अयोग्य कल्पना बाळगतो. अशा वेळी सद्गुरु किंवा सत्पुरुष साधकांना अत्यंत प्रेमाने आणि साधकांच्या स्थितीला जाऊन, समजावून सांगतात अन् साधकांना परमार्थाकडे वळवतात. त्याविषयीची उदाहरणे पाहूया.

१. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी ‘प्रपंच आणि परमार्थ कसा करावा ?’, यांविषयी केलेले मार्गदर्शन
१ अ. संसार प्रारब्धानुसार होत असतो आणि देवाच्या स्मरणात दुःख भोगले, तर त्या संकटाचा बाऊ न वाटता मनाची प्रसन्नता राखता येते अन् भगवंताकडे नामाचे प्रेम मागावे ! : ‘एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (श्री महाराज) यांना एका साधकाने विचारले, ‘‘अलीकडे माझ्या घरात आजार आणि संकटे येत आहेत. माझे देवाचे काही करण्यात चुकले आहे का ?’’ त्या साधकाला ‘आजार किंवा संकटे येऊ नयेत, प्रपंचातील काही तरी मिळवायचे; म्हणून साधना केली जाते’, असे वाटत होते.
तेव्हा श्री महाराज म्हणाले, ‘‘देवाचे करण्यात तुमचे काही चुकले नाही. समजा आपले चुकले; म्हणून देवाने शासन करायचे ठरवले, तर त्याला आपल्याला सततच शासन करावे लागेल; कारण प्रत्येक पावलागणिक आपली चूक होत असते. खरी चूक कोणती ?, तर भगवंताचे विस्मरण ! आपण कायमच भगवंताच्या विस्मरणात जगतो. त्यामुळे आपली पावलोपावली चूक होत असते. घरातील आजार, दुःख हे देव देत नसतो, तर ते आपल्या प्रारब्धाने आलेले असतात; पण देवाच्या स्मरणात ते दुःख भोगले, तर त्या संकटाचा बाऊ न वाटता मनाची प्रसन्नता राखता येते. यासाठी साधना करायची असते. ‘मनाची प्रसन्नता कोणत्याही परिस्थितीत अबाधित रहावी’, यासाठी मन सिद्ध करण्यासाठी साधना करायची असते. भगवंताकडे मागायचेच असेल, तर नामाचे प्रेम मागावे.’’
१ आ. प्रपंचाचा फोलपणा ओळखून प्रपंच करत साधना करणे आवश्यक ! : एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना एका साधकाने ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका ।।
(दासबोध, दशक १२ वा)’ (अर्थ : माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि नंतर परमार्थाचा विचार करावा.), हा समर्थ रामदासस्वामींचा श्लोक सांगितला आणि त्यातील ‘नेटका’ या शब्दाचा अर्थ विचारला. सामान्यपणे ‘नेटका, म्हणजे ‘प्रपंच व्यवस्थित होईल’, असा करावा’, असा अर्थ घेतला जातो.
तेव्हा श्री महाराज म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट करतांना त्या गोष्टीचे खरे स्वरूप काय आहे ?’, हे ओळखून करणे, याला ‘नेटकेपणाने करणे’, असे म्हणतात. प्रपंचाचे खरे स्वरूप, म्हणजे प्रपंचाची अपूर्णता ! प्रपंच अपूर्णच आहे. ‘प्रपंचातून शाश्वत सुख आणि समाधान कधीच मिळणार नाही’, हे ओळखून प्रपंचात रहाणे आणि प्रपंच करणे, म्हणजे प्रपंच नेटका करणे ! ‘नेटका करणे, म्हणजे नेटाने करणे नाही !’, हे सांगण्यासाठी समर्थ रामदासस्वामी पुढे म्हणतात, ‘‘संसार मुळींच नासका (अशाश्वत) । विवेकें करावा नेटका । नेटका करितां फिका । होत जातो ।।’’ (अर्थ : संसार मुळातच नासका आहे. तो विवेकाने नीटनेटका करावा. नेटका केला तरी तो आपोआप फिका वाटू लागतो.’’ (दासबोध, १९-१०-२८)
यावरून प्रपंचाचा फोलपणा ओळखून केवळ नामासाठी नाम (साधना) किंवा आनंदासाठी नाम अन् सद्गुरूंनी सांगितले; म्हणून नाम घेत रहावे. अशा साधकाला गुरूंची कृपा प्रत्येक क्षणागणिक जाणवेल. मग ‘मला दृष्टांत झाला का ? अनुभूती आली का ?’ हा प्रश्नच रहाणार नाही; कारण अशा साधकाचा प्रत्येक क्षणच आज्ञापालन, दृष्टांत आणि आनंद यांच्या अनुभूतीचा असेल. ‘गुरूंचे माझ्यावर सदैव लक्ष आहे. मी प्रत्येक गोष्ट गुरूंना आवडेल, अशीच करीन. माझ्या वर्तनामुळे गुरूंची मान कधीही खाली जाऊ देणार नाही’, या भावनेने तो साधक जीवन जगेल.’’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संतवचनांचा योग्य अर्थ सांगून आणि साधकांची श्रद्धा वाढवून साधकांकडून साधना करवून घेणे

वर्ष १९८९ पासून मी प्रत्येक आठवड्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले घेत असलेले अभ्यासवर्ग आणि सत्संग यांना जाऊ लागलो. त्यांनी सांगितलेली साधना केल्यामुळे मला अनुभूती येऊ लागल्या अन् आठवडाभर मी आनंद अनुभवू लागलो. तेव्हा ‘मी व्यवहार सोडून भलतेच काही तरी करण्यात वेळ घालवत आहे, वाया जात आहे’, असे माझ्या निकटवर्तीयांना वाटू लागले. ‘संसार सोडून अध्यात्म आणि साधना करायची नसते’, असे माझे जवळचे लोक मला शिकवू लागले. त्यातील काही जणांना थोडेसे अध्यात्म आणि श्लोक येत होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘समर्थ रामदासस्वामींनी सांगितले आहे, ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका ।।’’ यामुळे माझ्या मनाचा गोंधळ झाला.
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला समर्थ रामदासस्वामी यांच्या वचनांचा अर्थ : याविषयी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अभ्यासवर्गात विचारले. तेव्हा ते म्हणाले,
१. ‘‘ज्याला संसारही करता येत नाही, त्यांनी निदान संसार तरी चांगला करावा’, असे समर्थ रामदासस्वामी यांना सांगायचे आहे. हे केवळ प्राथमिक टप्प्याच्या साधकांसाठी आहे.
२. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘संसार’, म्हणजे ज्यातून सार निघून गेले आहे, त्याला संसार म्हटले आहे. साधकांनी हेसुद्धा लक्षात ठेवायला हवे अन् साधनेला प्राधान्य द्यायला हवे.
३. साधक पुढच्या टप्प्याची साधना करू लागल्यावर त्याने समर्थ रामदासस्वामी यांनी ‘परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख । (दासबोध २-१०-४०)’
अर्थ : या संसारात जो सुख मानतो, तो परम मूर्खामध्येही मूर्ख असतो’, हे लक्षात ठेवायला हवे.’’
त्यानंतर साधना करत असतांना मी कधीच मागे वळून पाहिले नाही. मी ‘कोण काय म्हणते ?’, याकडे लक्ष दिले नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जे सांगतात, ते ब्रह्मवाक्य मानून मी आनंदाने जीवन जगत आहे. अशा रितीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे माझ्यासारख्या सहस्रो साधकांचे शंकानिरसन करून ‘योग्य कसे असायला हवे ?’, हे सांगून ‘गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना’ करून घेत आहेत.

३. साधना प्रवासात संत आणि गुरु यांचे महत्त्व
संतांची वचने आणि ग्रंथातील ज्ञान समजावून सांगायला संत अन् गुरूच आवश्यक असतात; कारण आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा व्यावहारिक बुद्धीने जसा योग्य वाटेल, तसा अर्थ लावतो आणि तिथेच स्वतः फसतो अन् अन्यांनाही फसवतो.
४. कृतज्ञता
अत्यंत प्रेमाने साधकांचे शंकानिरसन करून साधना करून घेणारे आणि साधकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ (१५.१२.२०२४)
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.