मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – अतीवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी अन् अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी अर्थसाहाय्य घोषित केले होते. यामध्ये ५ लाख ३९ सहस्र ६०५ लाभार्थ्यांना ५९२ कोटी ३४ लाख ९० सहस्र ५३० रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. हे अर्थसाहाय्य संबंधित लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर साहाय्य आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
मंत्री मकरंद जाधव-पाटील पुढे म्हणाले, ‘‘आधार संलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या साहाय्यामध्ये अतीवृष्टी, पूर वर्ष २०२२, वर्ष २०२३, वर्ष २०२४; अवेळी पाऊस वर्ष २०२२-२३, वर्ष २०२३-२४; अवेळी पाऊस, अतीवृष्टी वर्ष २०२३-२४; दुष्काळ २०२३ आणि जून २०१९ मध्ये वादळी वारा अन् गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी आणि नागरिक यांना हे अर्थसाहाय्य आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे दिलासा मिळणार आहे. अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग या विभागांमध्ये हे अर्थसाहाय्य जमा झाले आहे.’’